खर्दे येथील एकाविरुद्ध मारवड पोलिसांत पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील खर्दे येथील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने एकाविरुद्ध मारवड पोलिसांत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्दे येथील १४ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गावातील रवींद्र फुलसिंग सोनवणे हा सदर मुलगी शाळेत जात असताना वाईट नजरेने पाहत असे. दिनांक ३ रोजी सदर मुलगी शौचास जात असताना रवींद्र याने पाळत ठेवून पाठलाग करत हात पकडला होता. सदर मुलीने त्यास रागाने पाहिले असता तो परत फिरून गेला. तिच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितल्याने ते रवींद्र याला समजावण्यासाठी गेले असता त्याने शिवीगाळ करत आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी बदनामी होईल या कारणाने विनयभंगाची तक्रार न देता शिवीगाळ केल्याची व धमकी दिल्याची तक्रार ४ रोजी पोलीसात दिली होती. मात्र रवींद्र सोनवणे यांच्या नातेवाईकांनी पोलीसात तक्रार दिल्याने सदर मुलीने रवींद्र सोनवणे याच्याविरुद्ध वारंवार पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.