
अमळनेर क्रीडा संकुल सौर ऊर्जेवर चालणार, आणखी साडेपाच कोटींचा प्रस्ताव सादर…
अमळनेर:- तालुका क्रीडा संकुलाच्या धावण्याचा ट्रॅक आणि बहुउद्देशीय सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे आले असून संकुलाच्या १०.६७ कोटी रुपयांच्या मंजूर निधींपैकी उर्वरित ६.६७ कोटी निधीतून जलतरण तलाव, सौर ऊर्जा प्रकल्प व जेष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक करण्याचा प्रस्ताव क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्तांकडे पाठवला आहे.

अमळनेर तालुका क्रीडा संकुलासाठी १० कोटी ६६लाख ९० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. पूर्वीचा १ कोटी आणि आताचा ३ कोटी असा एकूण चार कोटी निधी प्राप्त झाला आहे. आधीच्या एक कोटी रुपयात बहुउद्देशीय सभागृह, रनिंग ट्रॅक,कंपाऊंड असे काम झाले होते. मात्र वापराअभावी आणि देखभाल दुरुस्ती नसल्याने ट्रॅक, सभागृह कंपाउंड खराब झाले होते. नव्याने प्राप्त तीन कोटी रुपयांपैकी १.४४ कोटी व १ कोटी अशा दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यात बहुउद्देशीय हॉल चे नूतनीकरण , ४००मी ट्रॅकचे नूतनीकरण, बास्केट बॉल काँक्रीट मैदान, व्हॉलीबॉल मैदान, ज्यूडो, तायक्वांदो, कुस्ती यासाठी डोम टाईप स्वतंत्र हॉल करण्यात येत आहे.
पैकी बहुउद्देशीय हॉलचे व ४०० मीटर ट्रॅकचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यावर ४० लाख रुपये खर्च झाला आहे. बास्केट बॉल काँक्रीट मैदान आणि स्केटिंग रिंगचे काम सुरू झाले आहे. आगामी मैदानी स्पर्धेपर्यंत रनिंग ट्रॅक पूर्णत्वास आलेला असेल. डोम टाईप हॉलचे काम देखील सुरू करण्यात आले असून ज्यूडो, कराटे, तायक्वांदो, कुस्ती या स्पर्धा घेण्यासाठी तसेच सरावासाठी येणारी अडचण दूर होणार आहे.
मंत्री अनिल पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी पाठपुरावा करून ५.५० कोटींचा जलतरण तलाव , ५० लाखांचा सौर ऊर्जा प्रकल्प , संपूर्ण मैदानाचे कुंपण दुरुस्ती ५० लाख आणि जेष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक १६ लाख ९८ हजार असा एकूण ६ कोटी ६६ लाख ९८ हजार रुपयांचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
तालुका क्रीडा संकुलात आमूलाग्र बदल होणार असल्याने क्रीडा क्षेत्रात अमळनेर तालुक्याच्या विद्यार्थ्यांना प्रगती करता येणार आहे. तसेच संकुलातील आधुनिक व अद्ययावत सुविधांमुळे पोलीस भरती, सैन्य भरती व विविध ठिकाणी तरुणांना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होऊन शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवणार आहे.




