
पांझरा नदीला आवर्तन सोडण्याची मागणी…
अमळनेर : तालुक्यात एप्रिल महिन्यात टंचाई जाणवू लागली आहे. डांगर गावाचा टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींची पातळी झपाट्याने खाली चालली असून काही विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पांझरा नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा अधिक जाणवू लागला आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या चिंतेत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
डांगर गावाला मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणी पुरवठा योजना मंजूर आहे. शिरडाणे ता धुळे येथून पांझरा नदी काठावरून विहिरीवरून पाणी पुरवठा होत होता. विहिरीतील पाणी कमी झाल्याने टंचाई जाणवू लागली आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये टंचाई जाणवू लागली आहे. काही गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर असून निव्वळ वीज कनेक्शन मिळत नसल्याने पाणी पुरवठा सुरू होत नाही. नगाव बुद्रुक येथे देखील टंचाई जाणवू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते गौरव पाटील यांनी पांझरा नदीला तात्काळ आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आवर्तनामुळे धुळे जिल्ह्यातील व अमळनेर तालुक्यातील ८५ गावांचा पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. धुळे जिल्हयातील न्ह्याहळोद, कौठळ, तामसवाडी, हेंकळवाडी, कंचनपूर, वालखेडा, अजंदे, बेटावद, पढावद, भिलाने, तर अमळनेर तालुक्यातील तांदळी, शहापूर, भिलाली, एकतास, ब्राम्हणे, कळंबू, बोदर्डे, मुडी, मांडळ, वावडे, लोणसिम, लोणचारम, लोण बु., लोण खु., जवखेडा आदि गावांच्या पाणी पुरवठा विहीरी या नदीवर अवलंबून आहेत. त्यांचा टंचाईचा प्रश्न सुटणार आहे.
प्रतिक्रिया…
नगाव बुद्रुक येथे दोन दिवसात प्रयत्न करून पाणी पुरवठा सुरु केला जाईल. त्याचप्रमाणे वीज कनेक्शन साठी देखील तातडीने प्रयत्न करून टंचाईवर मात केली जाईल. – दिलीपराव पाटील , उपविभागीय अभियंता , ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अमळनेर

