अमळनेर:- अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली ज्वारीच्या शासकीय खरेदीला मुहूर्त सापडला असून अतिशय कमी उद्दिष्ट दिल्याने शेतकी संघाच्या गोदामातच ज्वारी खरेदी सुरू झाली आहे.
ज्वारी खरेदीचे आदेश आल्यानंतरही गोदाम उपलब्ध होत नसल्याने खरेदी होत नव्हती. मार्केटिंग फेडरेशन चे गोदाम बाजार समितीच्या आवारात उपलब्ध होते मात्र त्यांची १५ लाख थकबाकी असल्याने मार्केटिंग अधिकारी गोदाम देऊ शकत नव्हते. अखेरीस तब्बल १३ दिवसांनंतर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी फक्त २६०० क्विंटल उद्दिष्ट असल्याने खरेदी केलेली ज्वारी शेतकी संघाच्या गोदामात ठेवण्याची परवानगी दिली आहे. पुरवठा निरीक्षक संतोष बावणे यांच्या हस्ते काटा पूजन व धान्य पूजन करून खरेदीचा शुभारंभ झाला. प्रथम शेतकरी काशिनाथ रामदास पाटील (रा जानवे) यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी गोदाम व्यवस्थापक संगीता घोंगडे, शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील, तहसील कर्मचारी भिकन गायकवाड, सचिन निकम, अरुण पाटील, शिवाजी मोरे, भिकन पवार, मापाडी गणेश बारी आदी हजर होते.