बापू गरुड यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक…
अमळनेर:- अनावधानाने महिलेची रस्त्यावर पडलेली सात ग्रामची सोन्याची पोत एकाने प्रामाणिक पणे महिलेला परत केल्याने बापू दोधु गरुड याचे कौतुक होत आहे.
सखुबाई तुळशीराम भोई ही महिला पैलाड मारुती मंदिराजवळ घराबाहेर झोपलेली होती. महिलेने गळ्यातील सोन्याची पोत गळ्याबाहेर काढून ठेवली होती. १९ रोजी सकाळी उठल्यावर तिने गोधडी झटकून घडी केली व आवराआवर केल्याने पोत रस्त्यावर पडली. ती पोत बापू दोधु गरुड याला सापडली होती. पंकज भोई व इतरांनी पोत शोधण्याचा प्रयत्न केला असता बापू याने त्याला स्वतःला सापडली असल्याची प्रामाणिकपणे कबुली दिली. बापू गरुड व पंकज भोई यांनी महिलेच्या घरी जाऊन तिला सोन्याची पोत परत केली.बापूच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.