मोटरसायकलच्या समोरासमोर धडकेत बालकाचा मृत्यू…
अमळनेर:- प्रवेश घेण्यासाठी शाळेत पोहचण्यापूर्वीच विद्यार्थ्याचा मोटरसायकलीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ढेकू रोडवर इंडियन गॅस एजन्सी जवळ घडली.
अनिल ठाणसिंग पावरा (रा बोपाणी ता शिरपूर हल्ली मुक्काम मांडळ ता अमळनेर) व त्याचा साडू शिंगा पावरा हे मांडळ येथील विकास बडगुजर यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. २४ रोजी दुपारी ४ वाजता शिंगा पांडू पावरा हा त्याची मोटरसायकल (एमएच १८, एयु ९३२९) वर मुलगा अमित शिंगा पावरा (वय १२) व उमेश यांना पिंगळवाडे येथील आश्रम शाळेत प्रवेश घेण्यासाठी घेऊन जात असताना ढेकू गावाजवळ गॅस एजन्सीजवळ समोरून येणारी मोटरसायकल (क्रमांक एम एच १९ बी डी ७४१६) यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. यात अमित शिंगा पावरा जागीच ठार झाला तर उमेश शिंगा पावरा, आणि समोरील मोटरसायकलवर बसलेले चालक अजय वानखेडे व राहुल वानखेडे दोघे रा आर्डी ता अमळनेर हे जखमी झाले आहेत. मयताच्या शव विच्छेदनासाठी त्याचे शव व जखमीना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. अनिल पावरा याच्या फिर्यादिवरून अजय वानखेडे याच्या विरूद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.