अमळनेर:- तालुक्यातील सावखेडा व धावडे येथील तापी नदीपात्रालगतचे अवैध वाळू वाहतुकीचे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद करण्यात आले आहेत.
मागील काही दिवसांमध्ये अवैध गौण खनिज वाहनांवर तलाठी तसेच पथकामार्फत कारवाई करण्यात आल्याने वाळू वाहतुकीला आळा बसणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. सावखेडा येथील तलाठी सतीश शिंदे, पोलीस पाटील महेश पाटील, नागरिक किशोर माळे यांच्या उपस्थितीत जेसीबी यंत्रणेच्या साहाय्याने चोर रस्त्यांमध्ये चाऱ्या खोदून बंद करण्यात आले. तसेच अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत असल्यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली असून सावखेडा व धावडे या दोन्ही गावांमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रांताधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या महसूलच्या या उपाययोजनेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.