अवघ्या 2 मिनिटात होणार 2,222 वृक्षारोपण, टेकडीची मानव निर्मित जंगलाकडे होणार वाटचाल,हजारो विद्यार्थी व मान्यवर येणार
अमळनेर-येथील श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडीवर शनिवार दि.6 जून रोजी वृक्षारोपणाचा मोठा रेकॉर्ड होणार असून “एक रोप आईच्या नावे” या उपक्रमांतर्गत अवघ्या 2 मिनिटात 2,222 वृक्षारोपण 4,444 व्यक्तींच्या हस्ते केले जाणार आहे,यामाध्यमातून टेकडीची मानव निर्मित जंगलाकडे वाटचाल होणार आहे.
या कार्यक्रमाची जय्यत तयारी आयोजक असलेल्या श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुपने केली असून विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवर या अभियानास हातभार लावण्यासाठी पुढे सरसावले आहेत.कार्यक्रमाच्या दिवशी हजारो विद्यार्थी व मान्यवर उपस्थिती देणार आहेत.दरम्यान अमळनेर शहर व परिसर विकास आराखडा अंतर्गत श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी ग्रूप आणि तालुक्यातील पर्यावरण सेवेकरी यांच्या सहकार्याने वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्याचे काम मागील १० वर्षापासून निरंतर चालू आहे. ४०,००० वृक्षांची लागवड आता पर्यंत झालेली आहे. त्यामुळे अमळनेरच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. अशा आदर्श पर्यावरणपूरकउपक्रमात लोकांचाही सहभाग महत्वपूर्ण ठरेल यासाठी दि. ६ जुलै शनिवार रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी “एक रोप आईच्या नावे” या उपक्रमांतर्गत २ मिनिटात २,२२२ वृक्षारोपणाचा कार्यक्रम ४४४४ व्यक्तींच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
या राष्ट्रीय पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त पवित्र कार्यक्रमात शहरातील आजी माजी लोक प्रतिनिधी, शहरातील सर्व सामाजिक संस्था, शेतकरी बांधव, महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कमर्चारी, सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, एन.सी.सी., एन.एस.एस.चे विद्यार्थी, सिनियर सिटीझन, सर्व सरकारी आस्थापना आणि अमळनेरचे सर्व पर्यावरणप्रेमीं या अभिनव उपक्रमात सहभागी होणार आहेत.तरी प्रत्येकाने आपला आवर्जून सहभाग नोदवावा असे आवाहन श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी ग्रुपने केले आहे.अधिक माहितीसाठी ९९२३९३३३५५ यावर संपर्क साधावा.