
औद्योगिक वसाहतीत पायाभूत सोईसुविधासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही…
अमळनेर:- येथील महिलांचे काम कौतुकास्पद असून महिलांना मदतीचा हात देत महिलांसाठी महिला क्लस्टर, कौशल्य विकास केंद्र व महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवून अमळनेरच्या व्यापार उद्योगांना चालना देणार, सहकारी औद्योगिक वसाहतीत पायाभूत सोयीसुविधा मिळण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर काम करेल असे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी अमळनेर येथे सत्काराला उत्तर देतांना दिले. तसेच अमळनेरमधील व्यापार उद्योगाच्या वाढीसाठी , मार्केटिंग व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मासिआ बिझनेस नेटवर्किंग फोरम सुरु करावा, नवीन एमआयडीसीसाठी अमळनेरमधील शासनाची जागा असल्यास तसा प्रस्ताव दिल्यास शासनाकडे पाठपुरावा करू असेही गांधी यांनी सांगितले.
अमळनेर व्यापारी अडत असोसिएशन, अमळनेर मार्केट यार्ड व्यापारी संघटना, अमळनेर व्यापारी महिला महासंघ, अमळनेर व्यापारी महासंघ ,अमळनेर एमआयडीसी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगवे, उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष संगीता पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, मार्केट कमिटीचे जेष्ठ संचालक हरी भिका वाणी, खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, वेदांशु पाटील उपस्थित होते. सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार मार्केट कमिटीचे जेष्ठ संचालक हरी भिका वाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगवे, उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष सौ संगीता पाटील, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन अंजु सिंघल, को- चेअरमन भावेश मानेक, प्रफुल्ल संचेती, मंदार वाईकर, स्वप्निल जैन या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नीरज अग्रवाल यांनी उद्योगांसाठी जागा नाही एमआयडीसीत पाणी, रस्ता, वीज यासह पायाभूत सुविधा नसून शासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगितले. इन्कम टॅक्स व जीएसटी नियमांची परिभाषा वेगळी असल्याने आडत व्यापाऱ्यांना स्क्रुटिनीच्या नोटिसा येत असून ते चुकीचे आहे. उद्योगाला जीएसटीचे रिफंड मिळत नाही यासाठी चेंबरने पाठपुरावा करून मदत करावी असे सांगितले. अजय आहुजा यांनी इन्कम टॅक्सच्या अडचणी सांगून इन्फ्रास्ट्रक्चर नीट नसल्यामुळे ग्रीव्हन्स कमिटीचे काम नीट होत नसल्याचे सांगितले. एमआयडीसीचे अध्यक्ष जगदीश चौधरी यांनी १९७५ असून एमआयडीसी आहे मात्र रस्ते, पाणी नाही त्यामुळे उद्योग येत नाही. पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, ९० टक्के व्यापार ऑनलाईन झाला असून त्याचा परिणाम स्थानिक व्यापार उद्योगांवर झाला असून करामध्ये सवलत मिळावी, अमेय मुंदडा व अमळनेर व्यापारी महिला संघटनेच्या शितल सावंत यांनी अमळनेरमधील व्यापार उद्योगांच्या विविध अडचणी मांडल्या. वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगवे उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष सौ संगीता पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष ललित गांधी व जयश्री पाटील यांनी वेंदाशु पाटील यांचे कौतुक केले. याप्रसंगी स्वागत नीरज अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदांशू पाटील यांनी केले. कार्यक्रमास आदित्य बिल्डर्सचे प्रशांत निकम, मार्केट कमिटीचे संचालक प्रकाश वाणी, अमळनेर एम आय डी सी चे अध्यक्ष जगदीश चौधरी, व्यापारी उद्योजक संघटनांचे पदाधिकारी, महाराष्ट्र चेंबरचे सल्लागार दिलीप साळवेकर, सहायक सचिव अविनाश पाठक, शहरातील व्यापारी उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.