विधानसभा मतदार संघात ३२० मतदान केंद्रे झाली सज्ज…
अमळनेर:- विधानसभा मतदार संघात २१०० कर्मचारी निवडणूक कामासाठी रवाना करण्यात आले आहेत.३ लाख १ हजार ९३१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ३२० मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.
निवडणूक पारदर्शक करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बाहेरच्या तालुक्यात पाठवण्यात आले आहे. मतदान झाल्या नंतर पाकीट भरणे,मशीन सील करणे यात कर्मचाऱ्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी प्रत्येक केंद्रांवर सूचना पत्रक दिले असून केंद्रांवरील कोणत्या अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने काय काम करावे याबाबत त्यात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पाकीट भरण्यात अनेकदा कर्मचारी घोळ करत असत ,उलट सुलट प्रकार होत असल्याने तीन पांढरे , पिवळे , निळे , काळे , खाकी रंगाचे वेगवेगळे पाकीट देण्यात आले आहेत. त्यामुळे फारसा वेळ न जाता कामाची विभागणी होऊन अचूक कामकाज होणार आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , डी ए धनगर यांनी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक मतदान केंद्रावर चार अधिकारी , एक शिपाई ,एक पोलीस असे सहा याप्रमाणे एकूण २१०० कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर ३९ एस टी बसेस आणि २४ खाजगी वाहनांनी रवाना करण्यात आले. याव्यतिरिक्त मतदान केंद्राबाहेर व इतरत्र ७०० पोलीस कर्मचारी, सेक्टर अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत.