अमळनेर(प्रतिनिधी):- प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱ्या अमळनेरातील संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिनी संस्थानात आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
अमळनेर येथील संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिनी संस्थानाला प्रतिपंढरपूर असे संबोधले जाते.आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील हजारो भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी येत असतात.संस्थानातर्फ़े सकाळी ५ वाजता काकड आरती करून मंदिरापासून प्रभातफेरी ला सुरवात झाली,पुढे शहरातील मुख्य रस्त्यावरून सखाराम महाराज समाधी परिक्रमा करून विठ्ठल रुख्मिनी मंदिरात प्रभातफेरीचा समारोप झाला.सकाळी ९ वाजता संस्थानचे मुख्य पुजारी सखाहरी देव,जयप्रकाश देव यांनी आरती केली त्यानंतर १२ ते १ पोथी त्यांनतर पुन्हा आरती करून महानैवेद्य दिला गेला.सायंकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वरी प्रवचन,६ ते ७ हरिपाठ व नंतर रात्री ९ ते ११ हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील ७० पेक्षा जास्त गावातील अबाल,वृद्ध,महिला वारकऱ्यांच्या दिंड्या मंदिरात दर्शनासाठी आल्या.संस्थानातर्फे त्यांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.