अमळनेर – स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील इतर मुलांना मार्गदर्शन करावे. स्पर्धा परीक्षांचे चित्र नकारात्मकपणे न रंगविता तरुणांचे प्रश्न अन त्यांची दशा समजून घेतली तर समाजाला योग्य दिशा मिळू शकते. जीवन जगतांना आयुष्यात माणसं पेरा. गाव तेथे ग्रंथालय , तालुका तेथे अभ्यासिका व जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणीसाठी उत्कर्ष खान्देशी ग्रुपने प्रयत्न करावेत, असे मत माजी आयकर आयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी व्यक्त केले.
अमळनेर येथील बन्सिलाल पॅलेसमध्ये उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ, तालुक्यातील विविध विकास मंच सह इतर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या “कर्तृत्वाचा महासन्मान” प्रसंगी ते बोलत होते. सारथी पुण्याचे उपव्यवस्थापक अनिल पवार, डीवायएसपी सुनिल नंदवाडकर, बालरोगतज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांची विशेष उपस्थिती होती. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व नोबेल फाउंडेशनचे संचालक डॉ. जयदीप पाटील यांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे त्यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आपले पती गिरीश पाटील यांना किडनी दान करणाऱ्या आधुनिक सावित्री नूतन पाटील व सर्पमित्र गणेश शिंगारे यांनाही सन्मानित करण्यात आले. युपीएससी परीक्षेच्या माध्यमातून असिस्टंट कमांडंट पदी निवड झालेला यशपाल पवार, कनिष्ठ अभियंता सह तीन पदांवर निवड झालेली जिज्ञासा सांगोरे, हिमांशू सूर्यवंशी, नेव्ही निवड झालेला ज्ञानेश्वर काटे यांच्यासह विविध क्षेत्रात निवड झालेले युवक युवतींसह त्याच्या आई वडिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आदिवासी विकास विभागाच्या जॉईंट कमिशनर पदी पदोन्नती झालेले कपिल पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.सारथीचे उपव्यवस्थापक अनिल पवार यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शकाची संख्या वाढली आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, आपल्या पदाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. सारथीसारखी योजना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पाठबळ देत आहे. सारथी संस्था विद्यार्थ्यांना यशदायी ठरत आहे. अनेक विद्यार्थी आपले स्वप्न पुर्ण करीत असल्याचे सांगितले.सुनील नंदवाडकर म्हणाले कि, आजच्या परीवारात संवाद साधला जात नाही. ते मुके झाले आहेत, सध्या कुटुंबतील सदस्यामध्ये सु संवादाची गरज आहे. डॉ जयदीप पाटील यांनी सांगितले की, देशात दहशतवाद पेक्षा हातातून मोबाईल काढणे हि मोठी समस्या आहे. वयस्कर मंडळीशी परीवारातील सदस्य बोलत नाही तर जेष्ठ व्यक्तिना आधार व तरूणांना संस्कार देणे गरजेचे आहे. मोठ्या पगाराची मुले यांचे पालक वृद्धाश्रमात असतात, ही शोकांतिका आहे. मुले सुसंस्कृत होतात पण संस्कारी होतात का?असे सांगत यशाला विनयशीलतेशी जोड असावी लागते. बुद्धीची मशाल घेत मनाची तयारी करून अधिकारी बना. ज्यादिवशी मुले मायबापाची ओळख होतात तो दिवस त्यांच्यासाठी सोन्याचा असतो. डॉ डिगंबर महाले म्हणाले कि मित्रांची साथ व मित्राच्या असण्याने मला महत्त्व असल्याचे सांगत काही वेळ भावुक झाले. जॉईन कमिशनर कपील पवार यांनी प्रास्ताविक केले. असिस्टंट कमांडंट यशपाल पवार, क्रांती पाटील यानी आपली यशोगाथा कथन केली. युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार उमेश काटे यांनी आभार मानले. या सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ, अमळनेर तालुक्यातील सर्व विकास मंच, शिवशाही फाऊंडेशन यांच्या सह स्वामी विवेवकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर माजी प्रतापियन्स प्रबोधिनी, श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी ग्रुप, साने गुरूजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, सी.सी.एम.सी. प्रताप कॉलेज, अमळनेर पीटीए संघटना यांनी केले होते. यावेळी जळगाव जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, निवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख, निवृत्त प्राचार्य डॉ एस आर चौधरी, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्य उपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.