विधानसभेसाठी एकत्र आल्याच्या चर्चेने माजी आमदारांची विश्वासार्हता पणाला, साहेबराव पाटलांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी काढला ९ ऑगस्टचा मुहूर्त…
अमळनेर:- मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कालच्या भेटीने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून विधानसभेसाठी एकत्र आल्याच्या चर्चेने माजी आमदारांची मतदारात असलेली विश्वासर्हता पणाला लागली आहे.
२७ रोजी रात्री मंत्री अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांची धुळे येथे माजी नगरसेवक व समर्थकांसोबत भेट झाल्याच्या चर्चा तालुका भरात रंगल्या. कालच मंत्री अनिल पाटील यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांची सपत्नीक भेट भेटली. त्यांच्या भेटीनंतर मंत्री अनिल पाटील समर्थकांकडून “धरणासाठी दोन्ही दादा एकत्र”च्या पोस्ट व्हायरल झाल्या आणि अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शरद पवार गटाच्या मेळाव्यात जयंत पाटील यांची भेट घेत तुतारी फुंकली होती. यावेळी शरद पवार गटाच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी साहेबराव पाटील हेच शरद पवार गटाचे उमेदवार असतील असे भाकीत केले होते. मात्र स्वतः साहेबराव पाटील यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यांच्या या तळ्यात मळ्यात भूमिकेमुळे त्यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत ही त्यांनी कोणत्याही बाजूचे स्पष्ट समर्थन केले नव्हते. त्यामुळे स्वतःच्या सोईनुसार भूमिका घेणारा नेता अशी त्यांची भूमिका बनत चालली आहे. कालच्या भेटीनंतर मात्र अनेकांचा संताप उभाळून आला. एका कार्यकर्त्याने तर सोशल मीडियावर नेत्यांना शिवीगाळ केली. काहींनी गद्दार असल्याचे मेसेज फिरवत सोशल मीडियावर स्टेटस अपडेट केले होते.
साहेबराव पाटलांनी ९ ऑगस्टचा काढला मुहूर्त…
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी मंत्री अनिल पाटील हे सपत्नीक आले होते व गैरसमज करू नये असा खुलासा साहेबराव पाटील यांच्या स्विय सहायक रवींद्र पाटील यांनी केला आहे. तसेच क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी साहेबराव पाटील हे पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
तर मंत्री अनिल पाटील यांचा हा मास्टरस्ट्रोक…
कालच्या चर्चेनुसार माजी आमदार साहेबराव पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यास त्यांची विश्वासहर्ता तर संपेलच मात्र मंत्री अनिल पाटील यांचा मोठा मास्टरस्ट्रोक मानला जाईल. तसेच व्हायरल फोटोत मंत्री अनिल पाटील यांच्या सोबत चौधरी गटाचे तीन नगरसेवक ही दिसत असल्याने मंत्री गटाचे प्राबल्य वाढल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकासकामे त्याचबरोबर वेळेवर केलेल्या राजकिय खेळीने त्यांना मोठे बळ मिळणार आहे.
शरद पवारांची अमळनेर भेट ???
साहेबराव पाटील यांच्या ९ रोजीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच स्वतः शरदचंद्र पवार हे अमळनेर येथे भेट देणार असल्याची माहिती आहे. मात्र तापलेल्या राजकीय वातावरणात आणखी काय ट्विस्ट येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण पाटील यांच्यात झाले मनोमिलन -विनोद लांबोळे
सर्व आजी माजी नगरसेवकांच्या मध्यस्थीमुळे मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव यांच्यात मनोमिलन झाले असून या निर्णयाचे आम्ही सर्व आजी,माजी नगरसेवकांसह शेतकरी बांधव व जनतेनेही स्वागत केले असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी दिली. दि 29 रोजी राजवड येथे साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी हे मनोमिलन घडून यावेळी आगामी काळातील राजकीय वाटचालीसंदर्भात बऱ्याच चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभा तर साहेबराव पाटील यांनी नगरपालिकेत नेतृत्व अशी आमची सर्वांची इच्छा असून तसा आग्रह आम्ही साहेबराव पाटील यांना धरल्याने निश्चितच ते देखील सकारात्मक राहतील असे त्यांनी सांगितले,याबाबत कुणीही अधिकृत वक्तव्य केलेले नसले तरी यानिमित्ताने दोघांमध्ये दिलजमाई झाली हे मात्र निश्चित आहे. मंत्री अनिल पाटील यांनी मतदारसंघात जो भरघोस विकास केला तो जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून साहेबराब दादांची आमदारकी नंतर नगरपरिषदेतील कारकीर्द सर्वानी अनुभवली आहे.यामुळे दोन्ही नेते एक सोबतच आम्हाला व जनतेलाही हवे असल्याने आम्ही सर्वानी हे मनोमिलन घडवून आणले असल्याची माहिती विनोद लांबोळे यांनी दिली आहे.