एकाला अटकपूर्व जामीन मंजूर तर अन्य आरोपी अजूनही फरार…
अमळनेर:- तालुक्यातील सात्रीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांच्यावर सहा जणांनी केेलेल्या जीवघेणा हल्लातील फरार एका आरोपीला पोलिसांनी तब्बल दोन वर्षांनी अटक केली आहे. तर मुख्य संशयित आरोपी सुरेश पाटील जामिनावर असून अन्य जण अजूनही फरार आहेत. पोलिस त्यांच्याही मुसक्या लवकरच आवळणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २ जुलै २०२२ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावरील बाबाजी का ढाब्यावर सात्री येथील महेंद्र बोरसे हे आपल्या मित्रांसोबत जेवण करीत असताना अचानक सुंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश अर्जुन पाटील, त्यांचा मुलगा उमाकांत उर्फ( गोपाल ) पाटील , रितेश बोरसे, जिजाबराव पाटील, न्हानू पाटील, मल्हारी पाटील त्याठिकाणी आले व सुरेश पाटील याने त्याच्या सोबत असलेल्या लोकांना सांगितले की हा महेंद्र बोरसे याठिकाणी असून मला कायम सर्व ठिकाणी नडतो याला जिवंत सोडू नका ,कायमचा बंदोबस्त करा. त्याच बरोबर उमाकांत (गोपाल) याने हातातील फायटरने उजव्या डोळ्यावर वार केला. तर टिनू बोरसे याने हातातील लोखंडी पाईपने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तो महेंद्र याने हातावर झेलला. तर जिजाबराव पाटील यानेही लोखंडी पाईपने खांद्यावर मारहाण केली होती . महेंद्र खाली पडताच न्हानू पाटील व मल्हारी पाटील यांनी काठ्यांनी पाठीवर व बरगड्यांवर मारहाण केली. उमाकांत याने हातातील १० ग्रॅम ची अंगठी बळजबरीने काढून घेतली. महेंद्र च्या सोबतच्या मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता सुरेश याने काचेची बाटली टेबलावर फोडून त्याच्या पोटात घालण्याचा प्रयत्न केला. तो महेंद्रने चुकवूंन बाहेर आला तेव्हा उमाकांत याने चारचाकी क्रमांक एम एच १९, सी यु १२३४ ची लोखंडी रोड ने तोडफोड केली. अशी फिर्याद महेंद्र बोरसे यांनी पोलिसांत दिली होती. त्यांच्या मित्रांनी महेंद्र बोरसे याना डॉ अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. या घटनेतील एक आरोपी मल्हारी पाटील हा १४ दिवसाची न्यायालयीन कोठडित आहे. तर उमाकांत उर्फ गोपाल याला न्या. निलेश यलमाने याच्यासमोर उभे केले असता ८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील मुख्य आरोपी सुरेश अर्जुन पाटील याने या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून न्यायालयात अटकपूर्व जामीन टाकला होता. परंतु तांत्रिक कारणाने तो विड्रॉल झाला. त्यानंतर पुन्हा तो अर्ज टाकल्यानंतर त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तर अन्य आरोपी फरार आहेत.