अमळनेर: मुलाला नोकरी लावून देतो म्हणून नंदुरबार येथील मावस मेव्हण्यानेच पाच लाख ४० हजार रुपयात अमळनेर येथील सेवानिवृत्त ग्रामसेवकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आल्याने नंदुरबार येथील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर धोंडू पाटील (रा पिंपळे रोड देशमुख नगर) हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. जुलै २०२१ मध्ये त्यांची मावस बहीण सीमा सुनील पाटील व तिचे पती सुनील विश्वासराव पाटील (रा फकिरा शिंदे नगर नंदुरबार) हे दोघे उसनवार पैसे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी तुमचा मुलगा काय करतो असे विचारले. मुलगा बडोदा येथे कंपनीत आहे असे सांगितल्यावर त्यांनी आमची एच ए एल कंपनीत ओळख आहे त्याला तेथे नोकरी लावून देतो. त्यासाठी १५ -१६ लाख रुपये लागतील असे सांगितले. म्हणून मनोहर पाटील यांनी नातेवाईक आहेत म्हणून विश्वास ठेवून सुनील पाटील यांच्या सांगण्यावरून २६ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांचा मुलगा निखिल याच्या धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भालेर येथील शाखेच्या खात्यावर २ लाख ५० हजार रुपये व त्यांची आई सुमनबाई विश्वासराव पाटील यांच्या खात्यावर २ लाख ५० हजार आरटीजीएसने टाकले. त्यांनतर पुन्हा ऑर्डर काढण्यासाठी सुनील पाटील यांनी ४० हजार रुपये मागितले. त्याबदल्यात मनोहर पाटील यांचा मुलगा ललित पाटील यांच्या ईमेल वर एचएएल कंपनी ओझर नाशिकच्या नावाने बनावट आदेश यायचे व हजर होण्यापूर्वी पुढील तारीख देण्यात येत होती. पुन्हा लेखी पत्र आले मात्र त्याला नोकरी मिळालेली नाही. म्हणून मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील,सुमनबाई व निखिल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.