अमळनेर:- तालुक्यातील डांगर बु. येथे स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२४ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अमळनेर व ग्रामपंचायत कार्यालय, डांगर बु. यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन कापूस उत्पादक अर्थ सहाय्य अर्ज नोंदणी अभियान हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले होते. म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मयादेत प्रती हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक
शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टरी रु.5,000 (2 हेक्टरच्या मयादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा.मंत्रीमंडळाच्या
दि. 11 जूलै, 2024 च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. या शासननिर्णयास मुर्त स्वरूप देण्यासाठी शेतकरी हितार्थ लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ, ग्रामपंचायत डांगर यांच्या पुढाकारातून व तालुका कृषी अधिकारी अमळनेर, तलाठी कार्यालय डांगर बु. यांचे सहकार्य लाभलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक अर्थ सहाय्य अर्ज नोंदणी अभियानास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ३७६ अर्ज प्राप्त झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या अर्जासंबंधी अडचणींचे निरसन करण्यात आले. प्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ, उपसरपंच राकेश वाघ व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका सोनी पाटील, तलाठी मधुकर पाटील, कृषीसेवक रोहिदास भामरे, व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.