
अमळनेर:- स्वस्त सोने देण्याच्या बहाण्याने टुरिस्ट कंपनीच्या संचालकाने २ लाख ७० हजार रुपये घेवून फसवल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश भोगीलाल शहा (वय ६० रा न्यू प्लॉट भागवत रोड) नया भारत हॉलिडे इंटरनॅशनल टुरिस्ट कंपनीकडे भूतान जाण्यासाठी १ ऑक्टोबर २०२३ रोजी बुकिंग केले. २ रोजी त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून ५ हजार रुपये टुरिस्ट कंपनी मालक कल्पेश बाबूलाल पनारा यांच्या नावाने पाठवले व नन्तर पनारा यांच्या अहमदाबाद जिल्ह्यातील वेजलपूर येथील ऍक्सीस बँकेत १ लाख रुपये ट्रान्सफर केले. ३१ ऑक्टोबर रोजी शैलेश यांची पत्नी ज्योती हिच्या भ्रमणध्वनीवर कल्पेश याचा फोन आला की भूतान मध्ये सोने २७ हजार रुपये तोळे आहे. आमचे एजंट बुकिंग करून ठेवतील व टुर च्या दरम्यान तुम्हाला सोने मिळून जाईल म्हणून शैलेश यांनी ४ नोव्हेंबर २०२३ रोजी टुर मालक पनारा याच्या ऍक्सिस बँक व बँक ऑफ बडोदा च्या खात्यांमध्ये प्रत्येकी १ लाख ३५ हजार असे मिळून २ लाख ७० हजार रुपये ट्रान्सफर केले. व दहा तोळे सोने बुक केले. ८ रोजी शहा कुटुंबीय भूतान ला गेले. तेथे सोन्याबाबत विचारणा केली असता पनारा याने टुर च्या शेवटच्या दिवशी देण्यात येईल असे सांगितले. १५ रोजी अखेरच्या दिवशी टुर मालकाला विचारले असता सोने काही मिळाले नाही तुम्ही अमळनेर जा आम्ही तुम्हाला तेथे गेल्यावर २ लाख ७० हजार परत करू. मात्र वारंवार विचारणा करूनही पैसे परत केले नाही म्हणून अखेरीस शैलेश शहा यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला कल्पेश पनारा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

