मागील अखर्चित व यंदाचा मंजूर निधी एका वर्षात खर्च झाल्यास होणार भरीव काम…
अमळनेर:- यंदाच्या अर्थसंकल्पात पाडळसरे धरणाला सलग दुसऱ्या वर्षी १०० कोटींपेक्षा जास्तीचा निधी म्हणजे ११० कोटी निधी मिळाला आहे.
मागील वर्षी १३५ कोटी निधी मिळाला होता. त्यापैकी बराचसा निधी अखर्चित असून ११०-१२० कोटी निधी मिळेल अशी अपेक्षा आमदारांनी मागील आठवड्यात पाडळसरे धरण भेटीप्रसंगी व्यक्त केली होती. हा अखर्चित निधी खर्च करण्याची परवानगी मिळाल्यास एकूण जवळपास दोनशे कोटी निधी उपलब्ध होईल. व हा निधी एकाच वर्षात खर्च झाल्यास मोठ्या प्रमाणावर काम होणार आहे. मात्र मागील वर्षासारखा निधी उपलब्ध आहे मात्र खर्च झाला नाही अशी स्थिती उद्भवणार नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उपसा सिंचन सुरू होणे गरजेचे…
धरणाच्या प्रत्यक्ष लाभ उपसा सिंचन योजना सुरू झाल्यावर मिळणार असून त्या सुरू करण्यावर भर देणे गरजेचे आहे. अनेक उपसा सिंचन योजना थकीत विजबिलामुळे बंद पडल्या असून सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो. नदी पात्रात कायमस्वरुपी पाणीसाठा असल्याने फ्लोटिंग सोलर पॅनल सारखा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून उपसा सिंचन योजना सुरू करता येवू शकतात. या बंद पडलेल्या उपसा सिंचन योजनांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असून त्यामुळे शेतकऱ्यांना या पाणीसाठ्याचा तात्काळ लाभ मिळू शकतो.