ढेकूसीम, अंबासन व चारम गृप ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे औदार्य….
अमळनेर : पोळा हा सण शेतकऱ्यांचा आनंदाचा आणि शेती साठी राबणाऱ्या सर्जा राजाचा सन्मान करण्याचा सोहळा असतो. ग्रामीण भागात विविधता , भाऊबंदकीतील वाद किंवा मतभेद दूर करण्यासाठी या तिन्ही गावच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वांना एकच प्रकारचा बैलांचा साज देऊन ‛सुरेख’ पद्धतीने एकीचा व समानतेचा बैलपोळा साजरा केला.
ढेकूसीम ,अंबासन , चारम या तिन्ही गावच्या सरपंच सुरेखा प्रवीण पाटील या शिक्षिका असून त्यांनी यावर्षी तिन्ही गावातील पोळा सण एकीच्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी होकार देऊन बैलांसाठी लागणारा साज , पितळी घंट्यांची घाटी , केसरी दोर ,रंग , नारळ असे साहित्य सरपंच व सदस्यांनी स्वखर्चाने सर्व शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिन्ही गावातील बैलांची शिंगे , दोर सजावट एकाच प्रकारची दिसत होती. यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये एकीची भावना रुजली. त्याच प्रमाणे या तिन्ही गावाच्या शिवारात आजूबाजूच्या गावाच्या ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्यांना देखील बैलांचा साज मोफत देण्यात आला. साधारणतः एक जोडीचा साज १६०० रुपये याप्रमाणे सरासरी ८० बैलजोडीचे साहित्य एकूण १ लाख २८ हजार रुपयांचे साहित्य मोफत दिले. दोन तीन दिवस आधीच सर्व शेतकऱ्यांना बैलांचा साज वाटप करण्यात येऊन एकीचा व समानतेचा संदेश देण्यात आला.
पोळ्याच्या दिवशी तिन्ही गावाच्या बैलजोड्या एकत्र गावात एकाठिकाणी आणण्यात आल्या. सरपंच सुरेखा पाटील यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करून नंतर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यासाठी उपसरपंच जाधवराव पाटील , बेबाबाई पाटील , मंगल पाटील , सीमा पाटील ,सुरेखा भिल , मनीषा सोनवणे , भूषण पाटील , नामदेव पाटील , समाधान गायकवाड या सदस्यांचेही सहकार्य लाभले.
याव्यतिरिक्त देखील सरपंच सह ग्रामपंचायत सदस्य गावातील सुख दुःखाच्या प्रसंगी एकत्र येत गोरगरिबांना मदत ,आर्थिक सहकार्य करीत असतात. एकीचा बैल पोळा साजरा केल्याने सर्व गावकऱ्यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले.