जनजीवन विस्कळीत, अनेक विदयार्थी शाळा महाविद्यालयास मुकले
अमळनेर : विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद अमळनेर आगारात १०० टक्के यशस्वी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयास मुकावे लागले.
शासनाने आश्वासन देऊन सुद्धा सरकारी कर्मचार्यांप्रमाणे एस टी कर्मचार्यांना वेतन व भत्ते मिळालेले नाहीत. जुलमी शिस्त व आवेदन पद्धत रद्द करावी , २०१५ पासून स्वमालकीची एकही बस नाही त्या बसेस विकत घेण्यात याव्यात अशा मागण्यांसाठी एस टी कर्मचारी , वाहक , चालक , यांत्रिकी ,लिपिक संपावर गेले आहेत. अमळनेर आगारचा संप १०० टक्के यशस्वी झाला असून मुक्कामी गेलेल्या बसेस व्यतिरिक्त एकही बस आली किंवा गेली नाही. सर्व बसेस आगारात लावण्यात आल्या होत्या. बसस्थानकामध्ये शुकशुकाट होता. कर्मचाऱ्यांनी एका मंडपात घोषणाबाजी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
सुमारे तीनशे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. ६६ बसेस जागेवर थांबल्या होत्या. दररोजचा सरासरी २१०० ते २२०० किमी प्रवास थांबला महामंडळाच्या अमळनेर आगाराचे ५ ते ७ लाखाचे नुकसान झाले आहे. मुक्कामी गेलेल्या बस मध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेत आले मात्र त्यांना परत जायला अडचणी आल्या तर अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव दांड्या माराव्या लागल्या. शालेय क्रीडा स्पर्धाना देखील विद्यार्थी मुकले. बाहेरगावी महत्वाच्या कामाला जाणाऱ्या प्रवाश्यांच्या देखील गैरसोय झाली.