
विशेष कामगिरी केलेल्या महिलांचा प्रेरणादायी पुस्तके देत सत्कार…
अमळनेर :- तालुक्यातील कलाली येथील विकास मंच तर्फे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांच़्या मार्गदर्शनाखाली, गावात जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्ताने, ११ मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी, लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प सदस्या जयश्री अनिल पाटील उपस्थित होत्या. यावेळी राजमाता आई जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, गांवातील व परिसरातील विशेष कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार पुष्पगुच्छ व आदर्श महिलांच्या चरित्रांची स्फूर्तिदायक पुस्तके देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात बचत गटाच्या सिमा रगडे, पं.स.च्या संगिता घोगडे, म.पो.कॉ नेहा बारेला , आरोग्य सेविका श्रीमती पाडळे, ग्रामसेवक पवार -चव्हाण मॅडम, कृषी अधिकारी लांडगे मॅडम, सुवर्णपदक प्राप्त कुमारी राजकमल पाटील, कुमारी स्वाती कोळी, माजी सरपंच सौ.बेबीताई पाटील, माजी सरपंच वैशाली पाटील, पो.पा वसुंधराताई पाटील , उपसरपंच विजूबाई कोळी ,रंभाताई पाटील या भगिनींचा विशेष कामगिरी केल्याबद्दल सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांनी महिला सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमळनेर तालुका शेतकरी संघाचे प्रशासकिय संचालक मंगलसिंग सुर्यवंशी यांनी केले. मान्यवरांचा परिचय कु. दिशा पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निरुपम पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी गांवातील व परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन कु. शेजल पाटील हिने केले. उल्लेखनीय म्हणजे एवढ्या लहान गावात, महिलांचा सत्काराचा कार्यक्रम पहिल्यांदा पार पडला असून कार्यक्रमाच्या सर्वं नियोजनात प्रामुख्याने तऱुणींचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व शिक्षकवृंद जि.प शाळा, कलाली विकासमंचचे योगराज कोळी, कल्पेश गुर्जर सर, प्रमोद पा. विनोद पा. विजय वाघ, नंदू पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.







