मोहगणी वृक्षाच्या लागवडीसाठी अधिकाऱ्याकडून टाळाटाळ…
अमळनेर:- मोहगणी वृक्षाच्या लागवडीसाठी विलंब लावल्याने वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने पंचायत समिती आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास पंचायत समिती आवारात घडली.
जानवे येथील शरद नथु पाटील व सुभाष भिला पाटील यांनी शेतात मोहगणी वृक्षलागवड करण्यासाठी 7 मे ला ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. तसेच १९ जुलैला ऑफलाईन प्रस्ताव पंचायत समितीला दिला होता. ४५ दिवसात मंजुरी मिळणे आवश्यक असताना १३० दिवस उलटूनही मंजुरी मिळत नव्हती. वारंवार टाळाटाळ केली जात होती. अखेरीस १९ सप्टेंबर रोजी शरद पाटील यांनी निवेदन देऊन गटविकास अधिकारी किशोर शिंदे व सामूहिक कार्यक्रम अधिकारी किशोर ठाकरे यांच्यावर कारवाईसाठी २५ सप्टेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र मंजुरी देण्याऐवजी त्यांनी मोका पाहणी केली असता पूर्वतयारी केली नाही असा शेरा मारून आपण शेतात रब्बी हंगामात कापूस लागवड केली असे असे विचित्र उत्तर दिले. अद्याप खरीप हंगाम सुरू असताना गटविकास अधिकाऱ्यांनी असं विचित्र उत्तर दिल्यावर शरद पाटील अधिकच संतप्त झाले होते. त्यांनी २५ रोजी बाटलीत पेट्रोल आणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस सागर साळुंखे , कैलास शिंदे , शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील , डॉ अनिल शिंदे यांनी शरद पाटील यांना आवरून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रा सुभाष पाटील व डॉ अनिल शिंदे अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेले असता एकाने अश्लील शिवीगाळ केल्याने आंदोलक अधिकच संतप्त झाले. त्यावेळी इतर अधिकाऱ्यांनी आवराआवर केली.
जिल्हापरिषदचे रोजगार हमीचे गटविकास अधिकारी धांडे यांनी दोन दिवसात मंजुरी देतो असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.