
जेष्ठ नागरीक निर्वाह न्यायाधिकरणचे अध्यक्ष महादेव खेडकर यांचा आदेश
अमळनेर:- सुमारे आठ ते दहा वर्षांपासून वडिलांना पैसे न देणाऱ्या मुलाने दरमहा वडिलांना दोन हजार रुपये खावटी म्हणून सप्टेंबर २०२४ पासून देण्याचे आदेश जेष्ठ नागरीक निर्वाह न्यायाधिकरण चे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत. हिम्मत दोधु ठाकूर (वय ६५ रा श्रीकृष्णपुरा अमळनेर) यांचा मुलगा ज्ञानेश्वर हिम्मत ठाकूर हा सीआरपीएफ मध्ये चालक असून तो गेल्या आठ ते दहा वर्षांपासून वडिलांना उदरनिर्वाहासाठी पैसे देत नसल्याने त्याने खावटी द्यावी यासाठी वृद्धाने जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण कडे अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी झाली. आणि मुलाने देखील खावटी देण्यास होकार दिला. अध्यक्ष खेडकर यांनी मुलाने वडिलांना दरमहा २ हजार रुपये द्यावेत असे आदेश दिले आहेत. तहसीलदार व पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी करून अहवाल पाठवण्यात यावा असेही आदेशात म्हटले आहे.

