
अमळनेर:- देवीच्या दर्शनासाठी आलेल्या कमावत्या तरुणाचे अचानक दि. ६ रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच निधन झाल्याने जवखेडा गावकरी हळहळ व्यक्त केली जात आहे.
सहाय्यक कार्यालय अधिक्षक रेल्वे विभाग भुसावळ येथे नोकरीला असलेल्या कर्मचारी महेश वासुदेव पाटील (वय ४१) हा नवरात्रीनिमित्त अंचलवाडी येथील देवीच्या दर्शनासाठी जवखेडा ता. अमळनेर या आपल्या गावी सर्व कुटुंबासह आला होता. सकाळी तो शेतात जाऊन पाहणी करून परत आल्यावर दुपारी तो जेवायला बसला. जेवण झाल्यानंतर अचानक ह्रदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने जागीच बेशुद्ध झाला. त्यात त्याने जीव गमावला. ग्रामस्थांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता तो मृत झाला असल्याचे डॉ जी. एम. पाटील यांनी घोषित केले. महेश याला २ मुली असून पश्चात पत्नी, २ भाऊ आई वडील असा परिवार आहे. एक भाऊ चलथान येथे कंपनीत नोकरीला असून एक भाऊ शेती करतो. महेश हा सर्वात छोटा होता. तो एकमेव नोकरीला असून संपूर्ण कुटुंबाला आधार देणारा होता. तोच गमावल्याने परिवारावर दुःखाची छाया पसरली. तर गावकरी देखील सदर घटनेबद्दल हळहळ व्यक्त करत होते. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्य झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कैलास शिंदे हे करीत आहेत.

