
तापी नदी पात्रातून उत्खनन, कारवाईची मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील निम कळमसरे रस्त्यावर विट भट्ट्या उभारण्यात आल्या असून त्यासाठी बेकायदा गाळ वाहतूक सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

निम हायस्कूलच्या पाठीमागून पाडळसरे कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून तापी नदी पात्रातून विना परवाना गाळाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती असून त्यामार्गे वाहतूक करून विट भट्टी पर्यंत हा गाळ पोचवला जात आहे. जानेवारी महिन्यात निम ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. त्यात अवैध रित्या नदी काठावरील गाळ हा जेसिबीने काढून तो ट्रॅक्टरने वाहून नेला जात आहे त्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई सोडा पण चौकशी ही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत. तसेच या ठिकाणी डांगरी बोहरा निम परिसरातून जिवंत डेरेदार झाडांची कत्तल करून मोठ्या प्रमाणावर लाकडे विट भट्टीसाठी आणण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने व्यवसाय परवाना, गाळ वाहतूक परवाना, प्रत्यक्ष साठा यांचे मोजमाप व वाहतूक तसेच वृक्षतोड आदी बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया :-
चौकशी करून अवैध वीट भट्टी वर कारवाई करण्यात येईल. तसेच वन विभाग यांना ही अवैध वृक्षतोडीबाबत कारवाई साठी कळवण्यात येईल.
:-तहसीलदार मिलिंदकुमार वाघ




