
अमळनेर:- एक ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदाराने १९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज केल्यास त्याला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळेल. २०१९ च्या तुलनेत स्त्री पुरुष मतदारांचे लिंग गुणोत्तर ९२४ वरून ९५२ वर गेले आहे. तसेच यंदा साहित्य वाटप आणि मतमोजणी टाकरखेडा रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाच मतदान केंद्र वाढली, १३ हजार ७२८ मतदार वाढले…
१५ ऑक्टोबर अहर्ता दिनांकावर अमळनेर विधानसभा मतदार संघात १ लाख५६ हजार ९८० पुरुष मतदार आहेत. गेल्या वेळेपेक्षा ५ हजार २२९ पुरुष मतदार वाढले. तर १ लाख ४९ हजार ३८७ स्त्री मतदार आहेत म्हणजे ८ हजार ५०२ स्त्री मतदार वाढले. तसेच इतर ३ असे एकूण ३ लाख६ हजार ३७० मतदार आहेत एकूण १३ हजार ७२८ मतदार वाढले . अमळनेर शहरात ८३, ग्रामीण भागात १९० , तर पारोळा ग्रामीण भागात ५२ असे एकूण ३२५ मतदान केंद्र आहेत. गेल्या वेळेपेक्षा पाच मतदान केंद्र वाढली आहेत. त्यात परदानशीन म्हणजे तोंडावर पडदा असलेले मतदार असणारे ४७ केंद्र आहेत. ८५ पेक्षा जास्त वय असलेले ३ हजार ८८७ तर शारीरिक दृष्ट्या दुर्बल असे एकूण २ हजार ३१८ मतदार आहेत. अशा मतदारांसाठी घरीच मतदानाची सोय केली जाणार आहे. त्यांना फक्त दोनवेळा संधी दिली जाईल.
अकरा विशेष केंद्रे…
विशेष केंद्राची संख्या ११ असून त्यात एन टी मुंदडा ग्लोबल , नगरपालिका , डी आर कन्याशाळा ही तीन केंद्रे महिला केंद्रे असणार आहेत. यात सर्व कर्मचारी महिला असतील. सरस्वती विद्या मंदिरात युवा मतदान केंद्र असेल तर सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय व जी एस हायस्कूल मध्ये दिव्यांग मतदान केंद्रे असतील त्याठिकाणी सर्व दिव्यांग कर्मचारी नियुक्त असतील. तर गोल्डन विंगस स्कूल , नवीन मराठी शाळा , जिप शाळा मंगरूळ , जिप शाळा कळमसरे , जिप शाळा जवखेडे ही पाच केंद्रे आदर्श असतील.
१६३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग…
१६३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग द्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच निवडणुकीवर नियंत्रणासाठी ३ एफ एस टी पथक , ३ एस एस टी पथक ,३ व्हिएसटी पथक, तर २ व्ही व्ही टी पथक व ३४ +३ सेक्टर अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी १७९० कर्मचारी…
मतदान केंद्रांवर ३५८ केंद्राध्यक्ष, तसेच प्रत्येकी ३५८ प्रथम, द्वितीय आणि तृतीय अधिकारी व ३५८ शिपाई असे एकूण १७९० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ३९० कंट्रोल युनिट, ३९० बॅलेट युनिट आणि ४२३ व्हीव्हीपॅट सज्ज ठेवण्यात आले आहेत.
पत्रकार परिषदेस तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विकास देवरे, प्रशांत धमके, नितीन ढोकणे, रुपाली अडकमोल हजर होते.

