मुलाबाळांसह कुटुंबियांच्या आनंदावर विरजण…
अमळनेर:- राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून नवनियुक्त शिक्षकांसाठी सात दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केल्याने नवनियुक्त शिक्षकांची दिवाळीची सुट्टी वाया गेली आहे.
आधीच इलेक्शन ड्युटी त्यानंतर हे सात दिवसांचे प्रशिक्षण लागल्याने बाहेर जिल्ह्यातील शिक्षणसेवकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी राज्यातील सर्व नवनियुक्त शिक्षकांचे पन्नास तासांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेण्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. दिवाळीच्या सुट्टीत हे प्रशिक्षण आयोजित केल्याने नवनियुक्त शिक्षकांनी त्याला विरोध करत विविध संघटनांनी निवेदन दिले होते. मात्र या वेळापत्रकात कोणताही बदल न झाल्याने तालुकास्तरावर नियोजनाचे पत्र प्राप्त झाले आहे. अमळनेर तालुक्यातील २१ नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण जळगाव येथील गूळवे विद्यालयात ४ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी याबाबत पत्र दिले असून नमूद केलेल्या सर्व नवनियुक्त शिक्षकांना उपस्थित राहण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. आधीच इलेक्शन ड्युटी त्यानंतर हे सातदिवसीय प्रशिक्षण आयोजित केल्याने राज्यभरातील नवनियुक्त शिक्षक संताप व्यक्त करत आहेत.
प्रतिक्रिया…
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत नवनियुक्त शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षक अद्ययावत होण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.- रावसाहेब मांगो पाटील, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अमळनेर