चित्रपट गृहातील प्रेक्षकांची एकच धावपळ
अमळनेर : येथील एस एस सिनेप्लेक्सच्या जनरेटर ला आग लागल्याने दोन्ही चित्रपट गृहातील प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली. वेळीच अग्निशमन दल पोहचल्याने आग आटोक्यात येऊन रात्रीचा ९ चा शो पूर्ववत सुरू करण्यात आला.
३ रोजी सायंकाळी अचानक सिनेप्लेक्सच्या जनरेटर ला आग लागली. जनरेटर तळमजल्यावर खाली ठेवलेले असल्याने धोका काहीच नव्हता. मात्र धूर वर दुसऱ्या मजल्यावर चित्रपट गृहात गेल्याने हर्षदीप पाटील व आर्यन साळुंखे यांना गुदमरल्यासारखे झाल्याने त्यांनी गेटकीपरला सांगितले. गेटकीपर इमर्जन्सी दरवाजा उघडत नव्हता. श्वास कोंडले जात होते. दरवाजा उघडताच सर्व प्रेक्षक बाहेर पडले. अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे, जाफर पठाण, फारुख शेख, आनंदा झिम्बल, आकाश संदानशिव, योगेश कंखरे, आकाश बाविस्कर यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी एपीआय जगदीश गावित, पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल, अमोल पाटील ,जितेंद्र निकुंभे, योगेश सोनवणे, मिलींद बोरसे,गणेश पाटील, उदय बोरसे नगरपरिषद अभियंता डिगंबर वाघ हजर झाले. आग विझवल्यांनर जनरेटर दुरुस्त करून रात्री ९ पासून पुन्हा चित्रपट सुरू करण्यात आले.