निम येथील विट भट्टी साठी गाळ वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांमुळे शेतकऱ्याचे नुकसान…
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील विट भट्ट्यासाठी गाळ वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने सदर शेतकऱ्याने अमळनेर तहसील आवारातच दोरी आणून फाशी लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली आहे. त्यानंतर महसूल प्रशासनाला खळबळून जाग आल्याने तहसीलदारांनी निम येथे भेट देत कारवाईच्या सूचना केल्या.
निम येथील शेतकरी सुनील शिवाजी पवार यांनी आपल्या भावासह मिळून आपल्या सहा बिघे क्षेत्रात केळीचे पीक लावले असून त्यासाठी दुसऱ्याकडून पैसा घेत त्यांनी पिकासाठी खर्च केला आहे. मात्र निम शिवारात सुरू असलेल्या विट भट्ट्या साठी गाळाची वाहतूक ही सदर शेतकऱ्याच्या शेता जवळील रस्त्यावरून होत असल्याने धुळीमुळे केळीचे नुकसान झाले. व्यापाऱ्याने देखील केळी कापून नेण्यास नकार दिल्याने सदर शेतकरी उदिग्न झाला होता. त्यामुळे त्यांनी आठ दिवसापूर्वी तहसीलदारांकडे निवेदन दिले होते. मात्र त्यांनी २३ तारखेला पाहणी करू असे सांगितले. मात्र त्यानंतर तहसीलदार महत्त्वाच्या कामात असल्याने सदर शेतकऱ्याने प्रांतांची भेट घेतल्याने तलाठी यांनी त्याठिकाणी भेट दिली. काल शेतकऱ्याने तलाठ्यांना ट्रॅक्टर सुरू असल्याचा फोन केला मात्र त्यांच्याकडे परमिट असून ते सुरू राहतील असे सांगितल्यावर शेतकरी उदिग्ण झाल्याने सदर शेतकऱ्याने अमळनेर तहसील कार्यालयाच्या आवारात दोर आणून फाशी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थितांनी त्यांना थांबवत प्रांत व तहसिलदार यांनी सदर शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच तहसीलदार वाघ, तलाठी यांनी निम येथे शेतात तसेच उत्खनन होत असलेल्या जागी व विट भट्टीना भेट देत चौकशी केली. याठिकाणी गाळाचा अधिकच साठा आढळून आल्याचे तलाठी यांनी सांगितले असून तहसीलदारांनी कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे हि नमूद केले आहे. मात्र सदर शेतकऱ्याच्या निवेदनाची तात्काळ दखल महसूल कडून घेतली गेली असती तर त्या शेतकऱ्याचे नुकसान टळले असते व मनस्ताप ही झाला नसता. सदर शेतकऱ्याने आता झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
विटभट्टीचालक व गाळ वाहून नेणाऱ्याच्या मुजोरीला महसुलचे पाठबळ…
निम परिसरात सुरू असलेल्या या अवैध गाळ वाहतुकीविषयी निम ग्रामस्थांनी जानेवारी मध्ये निवेदन दिले होते. सदर शेतकऱ्याने ही वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच बातम्यांच्या माध्यमातून ही या अवैध कामाचा पाठपुरावा करून ही यंत्रणा कारवाई करण्यास धजत नसल्याने महसूल विभागाचे या कामास पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. परवान्याच्या चार पट गाळ काढून नेला असून परवानगी नाही त्या ठिकाणावरून ही गाळ काढून नेला जात आहे. सदर विट भट्टी चालकांकडे अधिकच गाळ साठा तहसीलदारांच्या भेटीत आढळून आला आहे. विट भट्टी चालकांच्या या खेळात वरपर्यंत हात रंगले असल्याची चर्चा असून त्यामुळे कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे. आता महसूल विभाग काय कारवाई करतो याकडे लक्ष लागून आहे. या अवैध कामांना अर्थपूर्ण पाठबळ देणाऱ्यांची सविस्तर पोलखोल, पुढील भागात...