बोहरा शिवारातील शेतात झाडाला घेतला गळफास…
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा शिवारात ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. २३ रोजी पहाटे घडली आहे.
मयत राजेंद्र वसंत राठोड वय ४५ हा राहणार चाळीसगाव तालुक्यातील उपखेड तांडा येथील असून गेल्या तीन महिन्यापासून बोहरा शिवारात ऊस तोडणीसाठी आलेला होता. दि. २३ रोजी पहाटे ट्रकचालक गाडी भरण्यासाठी घेवून आला असता त्याला लाईटच्या उजेडात रस्त्याच्या कडेला भोकरच्या झाडाला कोणीतरी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने सर्वांना उठवले असता राजेंद्र राठोड याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. तसेच मयतास दारूचे व्यसन व फिट येत असल्याचे खबरीत नमूद केले आहे. मयताचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर राठोड याच्या खबरीवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.