माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आवाहन…
अमळनेर:- लाडक्या बहिणीला जेव्हढे पैसे दिले त्यापेक्षा जास्त पैसे जाहिरातीवर खर्च झाला आहे. म्हणून महायुतीचे भ्रष्ट सरकार आपल्याला घालवायचे आहे असे आवाहन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमळनेर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात केले.
विद्यमान मंत्री अनिल पाटील यांचे नाव न घेता ते म्हणाले की, विरोधी उमेदवार काय आहे हे मला सांगण्याची गरज नाही. गडी आमदार झाला आणि सहा महिन्यात अप्रिय का झाला हे कळलेच नाही. निवडून आलो म्हणजे तुम्ही लोकांचे बॉस झाला असे नाही. लोक आपले गुलाम नाहीत , लोकांचे ऐकून घेतले तर त्यांचे दुःख कमी होते. डॉ अनिल शिंदे असा माणूस आहे की त्याच्या पोटात आणि ओठात एकच असते. महाविकास आघाडीची उमेदवारी मागणारे सर्व इच्छुक आज व्यासपीठावर येऊन डॉ शिंदे यांच्या पाठीशी आहेत याचा मला आनंद आहे.
यावेळी प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, अडीच वर्षात महाराष्ट्र धर्म नासवला आहे त्याचा बदला तुम्हाला घ्यायचा आहे. डॉ अनिल शिंदे यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. ऍड ललिता पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, आता सर्व एकत्र येऊन महाविकास आघाडीची ताकद दाखवू. उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी आपल्या भाषणातून मी उच्च शिक्षित असल्याने मला आघाडीने उमेदवारी दिली आहे. मी उत्कृष्ट सर्जन आहे मी विरोधकांची अशी सर्जरी करेल की त्यांना घरी पाठवेल.
यावेळी सदाभाऊ खोत व सुजय विखे पाटील यांचा निषेध करण्यात आला. मेळाव्याचे सूत्रसंचालन संदीप घोरपडे यांनी केले.
मेळाव्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. महाविकास आघाडीने पंचसूत्री दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडी सत्तेवर असताना आपण जुनी पेन्शन बंद केली त्याबद्दल काय वाटते यावर त्यांनी हा मुद्दा यंदा अजेंड्यावर घेतला आहे. एकीकडे आघाडी लाडकी बहीण योजनेवर टीका करते आणि दुसरीकडे अनुदान वाढवण्याचे आश्वासन देते त्यावर काय म्हणणे आहे असे विचारले असता थोरात म्हणाले की, अर्थनियोजन शिस्तीत नव्हते म्हणून योजना कोलमडली. पाडळसरे धरणाला महाविकास आघाडीच्या कार्यकाळात निधी मिळाला नाही असे विचारले असता त्यांनी आम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडतो, असे सांगितले.