अमळनेर : विधानसभा मतदार संघाचे मतदान २० रोजी झाल्यानंतर ईव्हीएम टाकरखेडा रस्त्यावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ५ नंबरच्या गोदामात ठेवले जाणार आहेत. त्या कक्षाभोवती त्रिस्तरीय सुरक्षा कवच आणि सीसीटीव्ही चे नियंत्रण असणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली.
त्रिस्तरीय सुरक्षा कवचात पहिल्या स्तरावर केंद्रीय सुरक्षा बलाचे(सी आर पी एफ) कर्मचारी , दुसऱ्या स्तरावर राज्य राखीव पोलीस बलाचे (एस आर पी एफ) कर्मचारी, तर तिसऱ्या स्तरावर राज्यस्तरीय पोलीस असतील. सुरक्षा कक्षास असलेल्या सीसीटीव्हीचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू असेल आणि हे पाहण्यासाठी उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी २४ तास प्रक्षेपण कक्षात उपस्थित राहू शकतील. तसेच ईव्हीएम सील केल्यापासून तर मतमोजणीपर्यंत उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी भेट देऊ शकतील आणि भेटीची नोंद नोंदवहीत करू शकतील.
२३ रोजी सीलबंद गोदाम क्रमांक ५ हे सकाळी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सकाळी ७ वाजता उघडण्यात येईल. नंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी व इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका,पोस्टाने आलेले मतदान मोजण्यात येईल असेही मुंडावरे यांनी सांगितले.