कुपोषित बालकांवर उपचार करत केले औषधींचे मोफत वाटप…
अमळनेर:- येथील ग्रामीण रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ जी एम पाटील यांनी मेळघाट भागात कुपोषित बालकांवर उपचार करत हजारो रुपयांच्या औषधी मोफत वाटप केल्या असून त्यांच्या या कार्याचे राज्याचे आरोग्य विभागाने कौतुक केले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागातर्फे मेळघाट मधील अति दुर्गम आदिवासी भागातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची तपासणी व उपचार मोहीम हाती घेण्यात आली असून संपूर्ण राज्यभरातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या भागात तपासणी करण्यासाठी 15 दिवसांची प्रतिनियुक्ती दिली जाते त्यानुसार अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ जी एम पाटील यांनी मेळघाट भागातील अमरावती जिल्हयातील चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा दिली. यावेळी डॉ पाटील यांनी ४५ अती तीव्र कुपोषित व १०५ मध्यम कुपोषित बालकांवर औषधोपचार केले. इतकेच नव्हे सदर बालकांसाठी डॉ पाटील यांनी स्व खर्चाने औषधी वाटप केले. डॉ पाटील यांनी केलेल्या वैद्यकीय सेवेची पाहणी करत आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडकर व गावाच्या सरपंच ललिता बेठेकर आणि अमरावती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कौतुक केले. डॉ पाटील यांचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.