अमळनेर : विधानसभा मतदारसंघात ईव्हीएमचे दुसरे यादृच्छीकरण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात १० रोजी दुपारी १ वाजता निवडणूक निरीक्षक डॉ रणजितकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली.
त्याचप्रमाणे मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याचवेळी अमळनेर विधानसभा मतदार संघातील नियुक्त महिला कर्मचारी व इतर बाहेरील विधानसभा मतदार संघातील नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्र तयार करण्यात येणार असून त्यांना त्यांचे मतदान करता येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मतदान बाकी राहील अशा कर्मचाऱ्यांना १९ रोजी तिसरे प्रशिक्षण व मतदान साहित्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक सहा मध्ये सुविधा केंद्राद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी उमेदवार आपले मतदान प्रतिनिधी कर्मचारी नियुक्त करू शकतात.
त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांनी १२ ड फॉर्म भरून दिला आहे त्यांचे मतदान १५ ,१६ व १७ नोव्हेंबर रोजी शहर तलाठी कार्यालयाच्या शेजारील राज सारथी सभागृहात घेण्यात येणार आहे.
दुसऱ्या यादृच्छीकरणनंतर ईव्हीएम कार्यान्वीकरण १२, १३ व १४ नोव्हेंबर रोजी टाकरखेडा रस्त्यावरील वखार महामंडळाच्या सहाव्या गोदामात होणार आहे. आयोगाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक व्हीव्हीपॅट मध्ये प्रत्येक उमेदवाराला नोटा सह एक मत दिले जाईल आणि कागदी पावती अचूक छापली जात आहे की नाही हे तपासले जाईल. ५ टक्के ईव्हीएमवर यादृच्छीक पद्धतीने १ हजार मतांचे अभिरुप मतदान केले जाईल.