अमळनेर : विधानसभा मतदार संघातील दुसऱ्या टप्प्यात १४३१ कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रशिक्षण दिले. ३८ कर्मचारी गैरहजर होते त्यांचे प्रशिक्षण १६ रोजी नगरपालिका सभागृहात होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील १२१ कर्मचाऱ्यांचे मतदान १५ ते १७ दरम्यान राजसारथी सभागृहात होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून १४५९ कर्मचारी प्रशिक्षणासाठी नियुक्त केले होते. गैरहजर ३८ कर्मचाऱ्यांमध्ये १२ केंद्राध्यक्ष , १५ प्रथम मतदान अधिकारी आणि ११ इतर अधिकारी यांचा समावेश होता. नितीनकुमार मुंडावरे यांनी स्वतः कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच निवडणूक निरीक्षक रणजित सिंग यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे कार्यान्वित करण्यात आले. यावेळी राजकीय नेते ,पक्ष प्रमुख हजर होते. तसेच निवडणूक कर्मचाऱ्याना ग्लोबल स्कूल मध्ये ईव्हीएम हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणूक कामासाठी अत्यावश्यक सेवेत असलेले होमगार्ड , आरोग्य सेवेतील कर्मचारी यांच्यासाठी मतदानाची सुविधा १५ ते १७ दरम्यान राजसारथी सभागृहात करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे ८५ वर्षावरील वृद्ध व दिव्यांग १९० मतदारांपैकी १८२ मतदान झाले. ४ मतदार मयत झाले तर ४ मतदार उपलब्ध होऊ शकले नाहीत.
प्रशिक्षण व निवडणूक कामासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे याना तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , नायब तहसीलदार प्रशांत धमके , नितीन ढोकणे , प्रथमेश पिंगळे, डी ए धनगर , पुरवठा निरीक्षक रुकसाना शेख , रुपाली अडकमोल , प्रियंका पाटील , संदीप पाटील यांनी सहकार्य केले.