अमळनेर – अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल येथे रविवार २४ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘टेक्नोवेद आर्ट मेला’ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात विविध विषयांची सांगोपांग माहिती विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थ्यांनी विज्ञान, कला आणि तंत्रज्ञान यांचे मिश्रण करत अनोख्या मॉडेल्स, चित्रे आणि माहिती तक्ते तयार केले होते.
या प्रदर्शनमध्ये एकूण ४८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात विज्ञान विषयक मॉडेल्स, आर्ट गॅलरीतील चित्रे आणि माहिती तक्ते यांचे आकर्षक प्रदर्शन समाविष्ट होते. विद्यार्थ्यांनी साकारलेले सप्तऋषी हे विशेष आकर्षण ठरले. या प्रदर्शनाचे परीक्षण शहरातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ शिक्षकांनी केले. प्रदर्शन बघण्यास आलेल्या सर्व पालकांनी व परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले आणि त्यांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे संस्थापक निरज अग्रवाल, चेअरमन सितिका अग्रवाल आणि मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांचे मार्गदर्शन लाभले. पालकांनी देखील उत्साहाने या कार्यक्रमाचे अवलोकन केले आणि विद्यार्थ्यांच्या कार्याची प्रशंसा केली.