धार मारवड व पारोळा रस्त्याचीही तीच गत, सा.बां. विभागाचे दुर्लक्ष...
अमळनेर : ढेकू रोडवरील फुटपाथ गवताच्या झुडुपात हरवल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून वेगाने येणाऱ्या वाहनांपासून बचाव करणे कठीण झाले आहे. तालुक्यातील मारवड रस्ता व पारोळा रस्त्याची ही तीच गत झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग हा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
अमळनेर शहरातील ढेकू रस्त्यावर दाट वस्ती असून शिक्षक ,ग्रामसेवक सह इतर विभागात नोकरी करणारे बहुसंख्य नागरिक या परिसरात राहतात. या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी फिरणाऱ्यांची संख्या भरपूर असून शहराच्या हद्दीबाहेरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व तालुका पोलीस स्टेशन असल्याने रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. त्याचप्रमाणे ढेकू ,शिरसाळे ,तरवाडे ,वावडे ,मांडळ आणि मांडळ लामकानी मार्गे गुजरात जाणारे वाहने याच रस्त्यावरून जातात. पायी फिरणाऱ्या नागरिकांना रस्त्याने चालताना त्रास होऊ नये आणि अपघात होऊ नये म्हणून या रस्त्यावर दोन्ही बाजूला फुटपाथ बांधण्यात आले आहेत. परंतु हे फुटपाथ कुचकामी ठरत आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला काटेरी झुडुप ,गवत इतके वाढले आहे की फुटपाथ तर दिसत नाही रस्त्याची किनार देखील झाकली जाते. त्यामुळे वाहतूकिला अडथळा निर्माण होतो.
सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावरील गवत व झुडुपे देखील काढत नाही आणि फुटपाथही मोकळा करीत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दररोज याच रस्त्याने कार्यालयात येतात तरी त्यांच्या नजरेस ही बाब पडू नये याचे आश्चर्य वाटते.
प्रतिक्रिया…
फुटपाथ सुरू होते तेव्हा दोन्ही बाजूला महिला, वृद्ध सुरक्षित चालू शकत होते. आता फुटपाथवर गवत झुडुपे वाढल्याने त्यावर चालता येत नाही. खाली रस्त्यावर चालताना भीती वाटते. – संजय पाटील ,ढेकू रोड नागरिक
प्रतिक्रिया…
जास्त पावसाने ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे गवत जास्त वाढले आहे. आणि पेव्हर ब्लॉक असल्याने त्याठिकाणी पावडी चालत नाही म्हणून सफाई करता येत नव्हती. येत्या दोन दिवसात साफसफाई करून फुटपाथ मोकळे करण्यात येतील- भागवत माळी, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग