अमळनेर : काकूंच्या प्रेतयात्रेला गेलेल्या सैनिकाच्या घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे दोन लाखाचे दागिने चोरून नेल्याची घटना ६ ते ९ डिसेंबर दरम्यान पिंपळे रोडवर घडली.
उदय हिम्मत पाटील (रा सुंदरनगर जयहिंद पार्क पिंपळे रोड) यांची अमळगाव येथील काकू मयत झाल्याने ते ६ रोजी घराला कुलूप लावून पत्नीसह अमळगाव गेले होते. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता ते घरी परतले तेव्हा त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडलेला दिसला. घरातील बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसला. कपाटाचे ड्रावर फेकलेले आढळून आले. बेडरूम मधील गादी खालील मका विकून आलेले एक लाख रुपये रोख, १ लाखांची सोन्याची पोत , २ हजार रुपयांचे चांदीचे ब्रासलेट असे चोरीस गेलेले आढळले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे, एपीआय जगदीश गावित यांनी भेट देऊन पंचनामा केला. उदय पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय जगदीश गावीत करीत आहेत.