अमळनेर : लाडक्या बहिणींना आगाऊ रकमा देणाऱ्या शासनाने लाडक्या भाऊंना दोन तीन महिने काम करून देखील कामाचा मोबदला दिलेला नसल्याने लाडक्या भाऊमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना काहीच काम न करता शासनाने १५०० रुपये महिना मानधन देण्याचा निर्णय घेतला. यावर तरुणांमध्ये नाराजी पसरल्याने मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. यात बेरोजगार युवकांना विविध कार्यालयात त्यांच्या शिक्षणाप्रमाणे १२ वी पास साठी ६ हजार रुपये प्रति महिना , आयटीआय पदविका ८ हजार रुपये प्रति महिना , पदवीधर पदव्युत्तर ला १० हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे. ही योजना सहा महिन्यांसाठी असून परिस्थिती पाहून तिची मुदत वाढवण्यात येणार आहे.
मात्र बेरोजगार युवक लागून आणि त्यांचे काम करून दोन तीन महिने झाले तरी त्यांना कामाचा मोबदला मिळालेला नाही. एकीकडे महिलांना काम न करता मानधन आणि दुसरीकडे पुरुषांना काम करून देखील मोबदला नाही यामुळे सरकारच्या मतभेदाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३३ पैकी १३२ युवक शिक्षण विभागात लागले आहेत. त्यांना कामे करून तीन महिने होऊन मानधन नाही. नगरपालिकेत सात बेरोजगार युवक आहेत त्यांना दोन महिन्यांपासून मोबदला नाही. आरोग्य विभागात १५ कर्मचारी आहेत. या लाडक्या भावांना कौशल्य ,विकास , रोजगार ,उद्योजकता विभागाचे आयुक्त याना नियंत्रण अधिकारी म्हणून वेतन त्यांच्या खात्यावर टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून अमळनेर पंचायत समितीकडून शिक्षण विभागातील प्रशिक्षणार्थी यांचा वेतनाचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. – रावसाहेब पाटील , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमळनेर