अमळनेर:- येथील पत्रकार प्रा डॉ विजय गाढे यांच्या कार्याची दखल घेत दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य अकादमीने या वर्षांचा खान्देशातून “डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप -2024” पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय साहित्य अकादमी,दिल्ली चे ४० वे राष्ट्रीय संमेलन दि. ८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे पार पडले. यावेळी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एस.पी सुमनाक्षर, राष्ट्रीय महासचिव जय सुमनाक्षर, प्रोफेसर रतन लाल सोनागरा (अध्यक्ष स्वागत समिती), तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तथा माजी मंत्री संघप्रिय गौतमजी यासह अनेक आजी, माजी मंत्री उपस्थित होते. प्रा डॉ विजय गाढे हे खान्देशात शिव- फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी अग्रणी भूमिका घेत असतात. प्रा डॉ विजय गाढे पुरोगामी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत. त्यांना ग्रंथालय शास्त्र विषयात विद्यावाचस्पती ही पदवी मिळालेली आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उच्चकोटीचे कार्य करणाऱ्या अखिल भारतीय साहित्य अकादमी ने नई दिल्ली येथे दि ८ व ९ डिसेंबरला ४० व्या राष्ट्रीय संमेलनात खान्देशातून या वर्षांचा राष्ट्रीय पुरस्कार “डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार -२०२४” हा पुरस्कार प्रा डॉ विजय गाढे यांना देण्यात आला आहे.त्यांनीं हा पुरस्कार आपले आई कालकथीत तुळसाबाई व वडील कालकथीत शालिग्राम यांना समर्पित केला.
या संमेलनात देशातील प्रत्येक राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा डॉ विजय गाढे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान मैराळे, साहित्य अकादमीचे जिल्हाउपाध्यक्ष चिंधु वानखेडे या सह समाजातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यांच्या वर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.