अमळनेर :- उसनवारीचे पैसे घेण्यासाठी चोपडयाहून आलेल्या एका इसमाला दोघांनी मारहाण करून त्याच्याजवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना धुळे रस्त्याला घडली असून दोघांवर अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र सुदाम महाजन याने 3 महिन्यापूर्वी सुनिल मनोहर सोनगिरे रा.चोपडा यांच्याकडून दीड लाख रुपये उसनवारीने मागितले होते.त्यातील 30 हजार रुपये घेण्यासाठी 8 डिसेंबर रोजी साडे पाच वाजता चोपडयाहून बोलवून घेतले. सायंकाळी 7 नंतर पैसे भेटणार असल्याचे सांगून आपण जेवण करू मग नंतर पैसे देतो असे सांगून महेंद्र महाजन व त्याचा मित्र दीपक मराठे यांनी सुनील सोनगिरे याला धुळे रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंप समोर मोटरसायकल थांबवून तू जास्त मातला असून पैश्यासाठी वारंवार तगादा लावतो असे म्हणत शिवीगाळ करून लथाबुक्क्यांनी मारहाण केली व हातातील 15 ग्रॅम वजनाची 40 हजार रुपयांची सोन्याची आंगठी,खिश्यातील रोख 5 हजार 300 रुपये काढून घेतले. व दोघेही मोटरसायकलवर निघून गेले. हाताला व डोक्याला मार लागल्याने सोनगीरे तेथेच पडून होते. धुळ्याचे लोकेश शालीग्राम सूर्यवंशी तेथे आले त्यांनी सोनगीरेला पाणी पाजले. सोनगीरे ला दवाखान्यात उपचारसाठी दाखल केले. दोन दिवस त्यांनी महाजन व पाटील पैसे करायला परत येतील याची वाट पाहून अमळनेर पोलिसात महेंद्र सुदाम महाजन व दीपक मराठे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 119 (1),3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे करीत आहेत.