अमळनेर : वाहतुकीच्या कोंडीमुळे बसस्थानकाजवळ एका डंपरने मोटरसायकलस्वारांना फरफटत नेल्याने दोन वृद्ध गंभीर जखमी झाले तर दोन लहान मुले बचावली आहेत. १३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे बसस्टँड परिसरात दररोज किरकोळ अपघात होत असल्याची प्रचंड नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
जनार्दन अर्जुन बारी वय ६० व पुंडलिक बाबुराव बारी वय ६७ हे दोन्ही रा पानखिडकी येथील चुलत भाऊ मोटरसायकलवरून नातवाना खेळणी घेण्यासाठी जात असताना बसस्थानकजवळ रिक्षा , टॅक्सी अवैध प्रवासी वाहने यांच्यामुळे कोंडी झालेली होती. डंपर क्रमांक एम एच १८ बी झेड ००७७ च्या चालकाने हयगय न करता वाहन चालवल्याने मोटरसायकल डंपर मध्ये अडकून दोन्ही वृद्ध व लहान मुले फरफटत नेली जात होती. लोकांनी आरडा ओरड केल्याने डंपर थांबला मात्र चालक फरार झाला.
अपघाताचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या आदेशाने पोलीस मिलिंद सोनार , प्रशांत पाटील , सचिन पाटील , विनोद संदानशीव , विलास बागुल , नितीन कापडणे यांनी भेट दिली. १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला असता १५ मिनिटं लागणार असल्याने दोन्ही वृद्धांना रिक्षाने ग्रामीण रुग्णालयात पोहचविण्यात आले. तेथून त्यांना नर्मदा फौंडेशनला नेण्यात आले. वाहतुकीची कोंडी सोडवून हर्षल पाटील या पोलिसाने डंपर चालवत पोलीस स्टेशनला जमा केले. एकाला पायाला तर दुसऱ्याला डोक्याला मार लागला होता. सुदैवाने लहान मुलांना काहीच लागले नाही.
धुळे चोपडा राज्य महामार्गावर आर के नगर ते पैलाड पर्यंत रस्त्यावर हातगाड्या , अवैध प्रवासी वाहने , फळ विक्रेते ,टपरी ,रिक्षा, टॅक्सी उभ्या राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानकाजवळ तर कहरच झाला आहे. पायी चालणे देखील कठीण होते. दोनच वाहतूक पोलीस संपूर्ण गाव सांभाळत असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. भागवत रस्त्यावरील लोखंडी अडथळे न काढल्याने किरकोळ विक्रेते आपल्या बा…चा रस्ता समजून रस्ता व्यापून घेतात. ज्याला जसे वाटेल तो तसे उभे राहतो. बोरी नदी पूलावर देखील विक्रेते प्रशासनाला न घाबरता बिनधास्त बाजार भरत आहेत. कथित सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मतांच्या बेरजा आणि आगामी पालिका निवडणुकामुळे लक्ष द्यायला तयार नाहीत. तर जबाबदार असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग , नगरपालिका , पोलीस प्रशासन कारवाई करायला तयार नाहीत. अनेक ठिकाणी दुकानांवर गर्दी होत असल्याने पार्किंग ची सोय नाही म्हणून ग्राहकांची वाहने रस्त्यावर लागतात. टॅक्सी चालकांना जागा देऊनही काही जण रस्त्यावर टॅक्सी उभी करतात. प्रशासनाचा धाक नसल्याने धक्का बुक्की ,किरकोळ अपघात या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते. जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही. एखाद्या दिवशी मोठा अपघात होऊन अनर्थ घडल्यास आश्चर्य वाटायला नको.
सार्वजनिक बांधकाम विभाग , नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तिक मोहीम राबवून धुळे चोपडा रस्त्यावरील कोंडी सोडवावी कठोर कारवाया कराव्यात ,सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून रोज दंड दिल्यास आठच दिवसात वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.