अमळनेर:- लाडकी बहिण, लाडका भाऊ अशा लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून विधानसभेची अवघड वाटणारी लढाई जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थावर लक्ष केंद्रीत केले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था ची निवडणूक एप्रिल नंतर होतील असा अंदाज बांधला जात आहे त्यामुळे अमळनेर नगर परिषदेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवनाऱ्यां इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
अमळनेर नगर परिषदेवर सध्या 26 डिसेंबर 2021 पासून प्रशासकाचे राज सुरू आहे, 26 डिसेंबर 2016 ते 25 डिसेंबर 2021 असा लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांचा आणि नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी होतो, तो संपल्यानंतर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांची 26 डिसेंबर 2021 रोजी प्रशासक नियुक्ती झाली होती सध्या मुख्याधिकारी तुषार नेरकर हेच प्रशासक आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू झाली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे. प्रामुख्याने महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना, सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा वेळ लागेल. त्यामुळे तूर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे, प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी आदींचा विचार करता निवडणूक तयारीसाठी किमान तीन महिने पेक्षा जास्त कालावधी हवा असतो. तसेच मार्च, एप्रिलमधील शाळांच्या परीक्षा आणि उन्हाळा तदनंतर पावसाळा उजाडतो. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी निवडणुका घ्यायच्या की पावसाळ्यानंतर याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार आहे असे असले तरी, त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.