अमळनेर -श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम,निम येथे दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा झाला.श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन तर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 8 वाजता श्री दत्त कैवल्य याग आरंभ झाले.
सकाळी 10 वाजता श्री दत्तात्रेय उदी कुंभाची भव्य पालखी मिरवणुक सुरु झाली,यात सर्व भक्त तल्लीन होऊन सहभागी होत होते. जळगाव,नंदुरबार,शिरपूर,अमळनेर येथील भक्तांनी विशेष सहभाग नोंदविला. महिलांनी फेटे बांधुन तसेच पुरुषांनी सारखा पोषाख परिधान केला होता. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,” च्या गजरात सर्व भक्त भक्तिमय वातावरणात सहभागी झाले होते. भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. 11 वाजता पालखी मुख्य मंडपात आल्यावर पूजनास सुरवात झाली. 12 वाजता दत्त आरती बरोबर स्वामी समर्थ,साई नाथ ,सद्गुरु श्री अनिरुद्ध यांच्या आरत्या झाल्या. प्रदक्षिणा आरतीने वातावरण भक्तिमयरीत्या भारावून गेले.
तापी नदी आणि पांझरा नदी च्या पवित्र परिसरात हा उत्सव साजरा झाला.गुरु गीतेच्या पठणा सोबत आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले. झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट केली होती. मंडपात गुढ्या, तोरणे ,केळीचे खांब लावून वातावरण पवित्र आणि प्रसन्न झाले होते. ह्या उत्सवासाठी जळगाव,धुळे,नंदुरबार,मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रा तून भक्त आले होते. परिसरातील ग्रामीण भागातील भक्त पण सहभागी झाले होते. शिस्तबद्ध आणि पर्यावरण पूरक उत्सवाचे सूक्ष्म नियोजन केले होते. ह्या परिसरात मार्गशीर्ष महिन्यात श्री वर्धमान व्रताधीराज उपासनेचे देखील आयोजन केले आहे.