अमळनेर : पळून गेलेल्या दोघांची माहिती मिळवण्यासाठी पाच जणांनी एका ३० वर्षीय तरुणाचेच अपहरण केल्याची घटना १४ रोजी रात्री साडे नऊ वाजता सानेनगर येथे घडली.
किरण नामदेव कुंभार (वय ३० रा सानेनगर) याने फिर्याद दिली की, १५ दिवसांपूर्वी त्याचा भाऊ दीपक हा जळगाव येथे पेपर देण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. तो घरी परत आला नाही. नंतर किरणला कळले की त्याचा भाऊ दीपक हा सुरत येथे जाऊन अरुण व्यंकट पाटील यांची नात हिला घेऊन पळून गेला आहे. १४ रोजी रात्री साडे नऊ वाजता अरुण व्यंकट पाटील हे किरणजवळ आले व म्हणाले की, पांढऱ्या रंगांच्या गाडीत पोलीस बसले आहेत तू गाडीजवळ चल. गाडीत चार जण बसले होते. एकाने त्याचा हात पकडून गाडीत बसवले. तर दुसऱ्याने मोबाईल बंद केला. ते बळजबरीने नेत असल्याने किरण आरडाओरड करू लागला. चौघांनी त्याचे तोंड रुमालाने बांधले आणि गाडी धुळ्याच्या दिशेने नेली. रस्त्यात निर्जन स्थळी गाडी नेऊन त्याचा भाऊ दिपक व वर्षा युवराज पाटील यांच्याबद्दल विचारपुस करताना चापट बुक्क्यानी मारहाण केली आणि शिवीगाळही केली. पुनः गाडीत बसवून धुळे मार्गे नाशिककडे गाडी नेली. रस्त्यात पुन्हा एका हॉटेलमध्ये दारू पिले आणि किरण ला मारहाण करीत राहिले. नंतर मालेगाव रोडच्या एका हॉटेलवर नेऊन त्याच्या शेजारील टपरीमध्ये कोंडून ठेवले. एकाने पुन्हा टपरिच्या बाहेर काढून पुन्हा चापटांनी बुक्क्यांनी मारहाण केली. १५ रोजी सकाळी साडे दहा वाजता पाचही जणांनी किरणला तेथेच सोडून दिले. एकाने भाड्याला १०० रुपये आणि चप्पल दिले. रिक्षाने किरण अमळनेरला घरी आला. आईवडीलांना घटना सांगून दवाखान्यात उपचार केले. किरण च्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अरुण व्यंकट पाटील व इतर चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता १४०(३),१२६(२), १२७(२), ११५, ३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.