
मारवड जि.प प्राथ. मुलींची शाळेत बोलक्या भिंतींसह केले आकर्षक रंगकाम…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे ग्रामस्थांनी व शिक्षकांनी लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत विविध आकर्षक रंगकाम केल्याने ग्रामस्थ व शिक्षकांचे कौतुक केले जात आहे.

१८ रोजी शालेय आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग खोल्यांचे उद्घाटन श्रीमती विद्यावती साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शांताराम साळुंखे, सरपंच आशाबाई भील, व्यवस्थापन समिती अध्यक्ष ललिता साळुंखे, हरिभाऊ मारवडकर, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य उज्वला पाटील, सदस्य सचिन साळुंखे, ग्रामस्थ सद्गुरु कोळी, सचिन साळुंखे, किशोर पाटील, श्रीकांत पाटील, शेखर पाटील, राजेंद्र सूर्यवंशी यासमवेत पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या आर्थिक योगदानातून शाळेचे अंतरंग व बाह्यरंग नवीन शैक्षणिक गुणवत्तापूर्ण बाबींनी रंगविण्यात आले. ग्रामस्थांनी शाळेला एकूण 52 हजार रुपयांचे योगदान दिले. या योगदानातून इयत्ता तिसरी व इयत्ता चौथी या वर्गांमध्ये विषयवार आकर्षक बोलक्या भिंतीसह रंगकाम करण्यात आले. शाळेची इमारत बाह्यअंगाने विविध विषयांनी आकर्षक बनविण्यात आली. यात पर्यावरण पाढे, बाराखडी, खेळ, पाणी वाचवा इत्यादी विषयांवर रंगछटा करण्यात आली. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील व केंद्रप्रमुख अशोक सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमप्रसंगी शांताराम साळुंखे व अशोक सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक दिनेश मोरे यांनी मानले. मुख्याध्यापक श्रीमती मनीषा निकम , प्रशिक्षणार्थी सुदीप साळुंखे यांचे सहकार्य लाभले.

