गुढीपाडव्याला “साद स्वरांच्या” सुरेल गीतांनी रसिक मंत्रमुग्ध…
अमळनेर:- शहराच्या सांस्कृतिक इतिहासात यंदाच्या गुढीपाडव्याला प्रथमच “सांज पाडवा”चे आयोजन केले असताना नाशिक येथील “साद स्वरांच्या” कलाकारांनी अतिशय सुरेल गीते सादर करून तळपत्या उन्हाळ्यात अमळनेरकर रसिकांना अक्षरशः गारेगार केले. कला रसिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद या कार्यक्रमास लाभला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुप आणि माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती विनोदभैय्या पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा रसिकांच्या मनाला भावणारा सुमधुर मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम न्यू प्लॉट भागातील श्री शिवाजी महाराज उद्यानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित नामवंत कलावंतानी रसिकांना आपल्या कलेने संपूर्ण तीन तास जागेवरच खिळवून ठेवले होते. अमळनेर भूमीतील सांस्कृतिक परंपरेत आतापर्यंत उद्योगपती विनोदभैय्या पाटील यांच्या पुढाकारानेच “पाडवा पहाट” कार्यक्रम अनेकदा होऊन गेले मात्र जास्तीतजास्त रसिकांना याचा आनंद मिळावा म्हणून यंदाच्या गुढीपाडव्याला प्रथमच “सांज पाडवा”2022 चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नाशिक येथील सुप्रसिद्ध अमोल पाळेकर यांच्या “साद स्वरांची” या टीमला निमंत्रित करण्यात आले होते. यातील गायक टीम मधील निवेदिका सोनल पडाया तसेच ज्योती केदारे, अमित पगारे आणि वादक देवानंद पाटील, शुभम जाधव, निखिल खैराते, रोहित कटारे यांनी आपल्या उत्कृष्ठ सादरीकरणातून प्रेक्षकांना अक्षरशः घायाळ केले. एकापेक्षा एक सुमधुर आवाजातील मराठी व हिंदी गीते ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी महिला भगिनींची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. साऱ्यांनी कार्यक्रमात समरस होत कलाकारांना डोक्यावर घेतले. निसर्गरम्य वातावरणात सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत तीन तास चाललेल्या कार्यक्रमात एकही प्रेक्षक खर्चीवरून हलला नव्हता. अखेरच्या गाण्यांवर महिला व पुरुषांनी ठेकाच धरला. खरोखरच अमळनेरच्या सांस्कृतिक नजराण्यात भर टाकणारा आणि या उन्हाळयात आमच्या मनाला गारवा देणारा हा कार्यक्रम ठरल्याची भावना रसिकांनी व्यक्त करून आयोजकांना विशेष धन्यवाद दिलेत.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी संपुर्ण तीन तास विशेष उपस्थित असलेले आ.अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात या उत्कृष्ठ आयोजनाबद्दल विनोदभैय्या पाटील व श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे कौतुक करत शिवाजी महाराज ग्रुप शहरात सर्वाधिक मोठा व चांगल्या कार्यामुळे साऱ्यांनाच भावत असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी आमदारांसह माजी आ.डॉ.बी.एस. पाटील, जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सौ.तिलोत्तमा पाटील, माजी आ.स्मिता वाघ, डॉ.अनिल शिंदे, जेष्ठ नेत्या अँड.ललिता पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, प्रभाकर कोठावदे, सौ राजश्री पाटील, प्रकाशचंद्र पारख, प्रेम शाह, नितीन शाह, डॉ.संजय शाह आदी मान्यवरांच्या हस्ते सदर आयोजनासाठी मोठे योगदान दिल्याबद्दल विनोदभैय्या पाटील व अलकाताई पाटील यांचा विशेष मोठा सत्कार करण्यात आला. या व्यतिरिक्त वेडसर व मतिमंद व्यक्तींना बरे करण्यासाठी सेवा देणारे पराग ताथेड आणि अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष झाल्याबद्दल अँड.एस.एस ब्रह्मे यांचा व उपस्थित कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ग्रुप एडमीन संजय चौधरी यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रुप एडमीन चेतन राजपूत, उज्वला शिरोडे तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुप आणि श्री विनोदभैय्या पाटील मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.