
अमळनेर – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 15 रोजी अनुदानित आश्रम शाळा पिंपळे, येथे करण्यात आले होते.
या प्रदर्शनात 17 शासकीय व 34 अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपकरणे सादर केली. उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करून प्रकल्पातील चार बीटमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन उपकरणांना प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. या प्रदर्शनात अनुक्रमे 14, 12 आणि 26 उपकरणांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन अरुण पवार प्रकल्प अधिकारी, यावल यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले आणि प्रयोगशीलता व नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले. प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) दौऱ्यावर घेऊन जाण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिले.
समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान अनिल झोपे, प्राचार्य, डायट जळगाव यांनी भूषवले. झोपे यांनी डायट जळगावच्या वतीने आदिवासी आश्रम शाळांसाठी शैक्षणिक मदत व सुधारणा यासाठी कायमस्वरूपी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्राथमिक गटात प्रथम क्रमांक अनुदानित आश्रम शाळा पिंपळे येथील इयत्ता सहावीचा विद्यार्थी सचिन पावरा व करण गोरे या विद्यार्थ्यांच्या उपकरणाला मिळाला. या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक इयत्ता अकरावी सायन्सचे विद्यार्थी दीपक पावरा व अनिल पावरा यांच्या यंत्राला मिळाला. या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना सचिन पाटील, रवींद्र नेरकर, गंगासागर वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना स्टेट बँक ऑफ इंडिया, यावल यांच्या वतीने इन्सिनेटर भेट देण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धर्मेंद्र कुमार सिंग (क्षेत्रीय व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक जळगाव), राधेश्याम मूंगमुळे (शाखा व्यवस्थापक, यावल), शामकांत ठाकरे (शाखा व्यवस्थापक अमळनेर) डॉ.सी.डी.साळुंखे (ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट जळगाव), सौ.विद्याताई युवराज पाटील (अध्यक्ष, श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी, पिंपळे), युवराज दगाजीराव पाटील (सचिव, श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी, पिंपळे) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निरीक्षण व मूल्यांकन कार्य निरंजन पेंढारे (विज्ञान शिक्षक, माध्यमिक विद्यालय वावडे, अमळनेर), डी.के.पाटील(विज्ञान शिक्षक, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, अमळनेर) व पी.डी.पाटील (जय योगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर) यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पवन पाटील सहा.प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल व अनुदानित आश्रम शाळा, पिंपळे यांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.