
अमळनेर:- आजारी शालकाला पाहायला सुरत येथे गेलेल्या तालुक्यातील वावडे येथील एकाच्या घरातून साडे सहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना २८ रोजी उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वावडे येथील संजय राजधर पाटील (वय ५२) हे २३ रोजी शालकाच्या तब्येत खराब असल्याने त्याला भेटायला सुरत येथे गेले होते. जातेवेळी त्यांनी घराची चाबी गावातील ओळखीच्या व्यक्तीकडे दिली. २५ रोजी ते सहकुटुंब घरी परत आले. २८ रोजी पैसे लागणार असल्याने त्यांनी कपाट उघडून पाहिले असता ३ लाख रुपयांची रोख रक्कम, ९५ हजार रुपये किमतीचे १९ ग्रॅम वजनाचे सोने, ८५ हजार किमतीच्या १७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, व १ लाख ७५ हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत असा ऐवज दिसून आला नाही. त्यामुळे सदर मुद्देमाल गावी गेल्याच्या काळातच चोरीला गेल्याची खात्री झाल्याने संजय पाटील यांनी मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.




