![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/IMG_20250129_070115-scaled.jpg?fit=1024%2C777&ssl=1)
समाधी स्थळी वानराची मूर्ती उभारण्याचा तालुक्यातील नीम येथील गावकऱ्यांचा निर्णय…
अमळनेर : अखेरच्या क्षणी मारुतीरायाचा पाया पडून जीव सोडणाऱ्या वानराची गावकऱ्यांनी विधिवत अंत्ययात्रा काढून समाधी देण्यात आली. व समाधी स्थळी वानराची मूर्ती उभारण्याचा निर्णय तालुक्यातील नीम येथील गावकऱ्यांनी घेतला आहे.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/1002687504.gif?resize=640%2C768&ssl=1)
२७ रोजी दुपारच्या वेळी एक म्हातारे वानर हुकूमचंद पाटील यांच्या धाब्यावरून खाली पडले. ते म्हातारे असल्याने विव्हळत होते. गावकऱ्यांनी त्याला तातडीने डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने उपचार करत वानराला ताप असल्याने त्याला इंजेक्शन देण्यात आले. गावकऱ्यांनी वानराला पुन्हा गावात मारूती मंदिराजवळ आणले. त्याचवेळी वानराने पटकन उडी घेऊन मारुतीच्या पायाशी डोके ठेवले आणि खाली झोपले. गावकऱ्यांनी पुन्हा त्याला बाहेर काढून पाणी पाजले. पुन्हा वानराने मारुतीच्या पायाजवळ जाऊन डोके ठेवले आणि तेथेच प्राण सोडले. यामुळे गावकरी भावनाविवश झाले. त्यांनी पुजाऱ्याला विचारून वानराची विधिवत अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी नवीन कापड ,टोपी अंत्यविधीचे सर्व साहित्य आणून डोली सजवली. वाजत गाजत सर्व गावातून अंत्ययात्रा काढली. महिला भगिनींसह गावकरी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. समाधान कोळी आगारी बनला. गुलाब कोळी ,ज्ञानेश्वर पाटील, बाळू पाटील , अशोक कोळी , श्रीराम पवार हे खांदेकरी बनले. समाधान कोळी याने केसही दिले. या वानराला समाधी देण्यात आली. वानराचे उत्तरकार्य करण्यात येणार असून त्याच समाधी स्थळी त्याची मूर्ती उभारण्यात येणार आहे.दीपक कोळी,श्रीराम कोळी ,अशोक पवार, विलास पवार, जितेंद्र अहिरे, भगवान कोळी ,गुलाब कोळी ,आनंदा कोळी यांचे सहकार्य लाभले